गुन्हेगारीचे माहेरघर पुणे भररस्त्यात तरुणीवर लाथाबुक्क्यांचा मारा, तर दुसरीकडे कोथरुडमध्ये गुंडांनी सीसीटीव्हीलाच दाखवले पिस्तूल-कोयता

पुणे : एकीकडे नवरात्र उत्सवात महिलांचा सन्मान होत असताना, पुण्यातील रस्त्यांवर मात्र गुन्हेगारीचा कहर वाढताना दिसतो आहे. धक्कादायक म्हणजे काल ३० सप्टेंबर रोजी एक दिवसांत दोन भिन्न घटना समोर आल्या आहेत ज्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

छावा डिजिटल न्यूज पोर्टल, पुणे — १ ऑक्टोबर  

घटना १ : भररस्त्यात तरुणीवर अमानुष मारहाण

पुणे-सातारा रोडवरील के.के. मार्केट – चव्हाण नगर मार्गावर मंगळवारी रात्री एका तरुणाने भररस्त्यात तरुणीला कानशिलात लावून पेकाटात लाथ घातली. तरुणी रिक्षामध्ये बसलेली असतानाही मारहाण सुरूच होती. या प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल झाला आहे.

घटनेच्या वेळी आजूबाजूला लोक उपस्थित होते; मात्र कुणीही मध्यस्थी केली नाही. सहकारनगर पोलिसांनी सांगितले की,

“घटनेचा व्हिडीओ आमच्या लक्षात आला आहे. मात्र अद्याप अधिकृत तक्रार प्राप्त झालेली नाही. आवश्यक तपास सुरू आहे.”

नागरिकांनी या प्रकारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.

घटना २ : कोथरुडमध्ये गुंडांची दहशत – पिस्तूल व कोयता दाखवत सीसीटीव्हीत कैद

कोथरुड परिसरात मंगळवारी पहाटे साधारण ५ वाजता दोन गुंडांनी थेट एका सोसायटीत प्रवेश केला. त्यांनी कुठलाही धाक न बाळगता सीसीटीव्ही कॅमेऱ्यासमोरच पिस्तूल व कोयता दाखवत दहशत माजवली. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

यामुळे स्थानिकांना मोठा धक्का बसला असून, गुन्हेगारांना कायद्याचा अजिबात धाक उरलेला नाही का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

यापूर्वी याच परिसरात गाडी ओव्हरटेक न केल्याच्या क्षुल्लक कारणावरून दोन तरुणांवर गोळीबार झाला होता. त्या प्रकरणात निलेश घायवळ टोळीचे हात असल्याचे उघड झाले होते. पोलिसांनी आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई केली असली तरी टोळीचा म्होरक्या निलेश घायवळ हा विदेशात पळाल्याचे सांगण्यात येत आहे.

या दोन्ही घटनांमुळे पुण्यातील कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

भररस्त्यात महिलांवर उघडपणे हल्ले

सोसायटीत शिरून सीसीटीव्हीला शस्त्रं दाखवणारे गुंड

याआधी झालेल्या गोळीबाराच्या घटना

टोळ्यांचा वाढता प्रभाव

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, “सांस्कृतिक राजधानी पुणे आता गुन्हेगारीचे माहेरघर झाले आहे ?” अशी चर्चा रंगत आहे.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *