खरी जिवंत देवी –रायगडची महाकाली – आचल दलाल
नवरात्रीत पारंपरिक नववा दिवस सिद्धिदात्री पूजेसाठी मानला जातो. पण आपल्या मालिकेत आम्ही हा शेवटचा दिवस ‘महाकाली’ या रूपाशी जोडला आहे कारण समाजातील अन्याय, गुन्हे आणि अंधाराचा संहार करणाऱ्या खऱ्या जिवंत देवीचं प्रतीक ह्याच रूपात स्पष्ट होतं.”
महाकालीचीच्या डोळ्यांत ज्वाला असतात, हातात शस्त्रं असतात आणि मनात जनतेसाठी अपार प्रेम असतं. आज रायगडच्या भूमीत ही महाकाली जिवंत आहे — पोलीस अधीक्षक आचल दलाल यांच्या रूपात. ही फक्त त्यांची गोष्ट नाही; ती प्रत्येक धैर्यशील स्त्रीची गोष्ट आहे जी अन्यायाविरुद्ध उभी राहते. म्हणूनच या मालिकेचा शेवट एका जयघोषानेच व्हायला हवा — तूच समाजाची महाकाली, तूच धैर्याची मूर्ती, तूच न्यायाची हमी… तूच!”
छावा डिजिटल न्यूज पोर्टल— सचिन मयेकर रेवदंडा—बुधवार — ०१ ऑक्टोबर २०२५
महाकाली —ही केवळ एक देवी नाही, तर अन्याय, अत्याचार, गुन्हे आणि अन्याय्य शक्तींचा संहार करणारी अदम्य शक्ती आहे. तिच्या डोळ्यांत ज्वालासारखं तेज असतं, हातात शस्त्रं असतात आणि मनात जनतेसाठी अपार प्रेम असतं. आज हाच महाकालीचा अवतार रायगड जिल्ह्यात जिवंत आहे – रायगडच्या पहिल्या महिला पोलीस अधीक्षक आचल दलाल यांच्या रूपाने. २२ मे २०२५ हा दिवस रायगडच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल. कारण या दिवशी रायगड जिल्ह्याने पहिल्या महिला पोलीस अधीक्षकांचा मान मिळवला. आचल दलाल मॅडमनी पदभार स्वीकारताच नागरिकांच्या डोळ्यांत आशेचा प्रकाश उगवला. हा केवळ नेमणुकीचा आदेश नव्हता, तर रायगडच्या जनतेसाठी एक नवा विश्वास, नवी शक्ती आणि नव्या सुरक्षिततेचं आश्वासन होतं. भारतीय पोलीस सेवेतील त्यांच्या प्रवासाला सुरुवात झाली UPSC सारख्या कठीण स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन. ही परीक्षा केवळ बुद्धीची नाही, तर संयम, आत्मविश्वास आणि कठोर परिश्रमाची खरी कसोटी आहे. आचल दलाल यांनी ही कसोटी यशस्वीरीत्या पार पाडली आणि पोलीस दलात दाखल झाल्या. प्रशिक्षण काळापासूनच त्यांच्या झुंजार वृत्तीची छाप वरिष्ठांवर उमटली होती. सातारा, सांगली, पुणे अशा जिल्ह्यांमध्ये त्यांनी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. साताऱ्यात अपर पोलीस अधीक्षक असताना त्यांनी जुगार अड्ड्यांवर धडक कारवाई केली, महाविद्यालय परिसरात होणारी छेडछाड रोखली, आणि विद्यार्थिनींना सुरक्षित वातावरण मिळवून दिलं. सांगलीत गुन्हेगारी नियंत्रणासाठी त्यांनी कठोर पावलं उचलली. पुण्यात राज्य राखीव पोलीस दलात समादेशक म्हणून त्यांनी पोलीस दलात नवी उर्जा आणि शिस्त निर्माण केली. त्यांच्या या कामगिरीची दखल घेऊन त्यांना “उत्कृष्ट महिला अधिकारी” पुरस्कारही मिळाला. रायगड जिल्ह्यातील कार्यकाळात त्यांनी पदभार स्वीकारताच कठोर कारवाईचा मार्ग अवलंबला. अनधिकृत धंदे, गुन्हेगारी टोळ्या, आणि समाजाला असुरक्षित वाटणारे सर्व घटक यांच्या विरोधात त्यांनी युद्ध छेडलं. पण याच वेळी सामान्य नागरिकांच्या तक्रारी मायेने ऐकून त्यांना त्वरित न्याय मिळवून देण्याचा ध्यास घेतला. समाजात अजूनही मुलगी जन्माला आली की काहीजण तिला ओझं मानतात. पण आचल दलाल यांचा प्रवास हे सिद्ध करतो की स्त्री म्हणजे दुर्गामायचीच शक्ती आहे. ती आई, बहीण, पत्नी या रूपात आधार देत असते, पण जेव्हा गरज पडते तेव्हा तीच रौद्र रूप घेऊन अन्यायाच्या विरोधात उभी राहते. पोलिस दलाच्या गणवेशात हीच स्त्री आज रायगडच्या रस्त्यांवर, गावोगावी, प्रत्येक नागरिकासाठी जागरूक उभी आहे. महाकालीचं खरं रूप म्हणजे रौद्रपणा आणि ममता यांचा संगम. आचल दलाल मॅडम नागरिकांच्या तक्रारी संवेदनशीलतेने ऐकतात, त्यांना दिलासा देतात. पण गुन्हेगारांसाठी त्यांच्या डोळ्यांत ज्वालासारखं तेज दिसून येतं. त्यांनी महिलांच्या सुरक्षिततेसाठी विशेष यंत्रणा उभारल्या आहेत. गावोगावी न्यायाची ताकद पोहोचवणं हा त्यांचा खरा संकल्प आहे. आज रायगडकर निर्धास्त झोपतात, कारण त्यांच्या पाठीशी एक धैर्यशील, निष्ठावान आणि प्रामाणिक अधिकारी उभ्या आहेत. आचल दलाल या केवळ पोलीस अधीक्षक नाहीत, तर रायगड जिल्ह्याच्या सुरक्षिततेचा, न्यायाचा आणि धैर्याचा खंबीर आधारस्तंभ आहेत. जर कोणी विचारलं – खरी जिवंत देवी कुठे पाहायची? तर उत्तर एकच असेल – रायगडच्या पोलीस अधीक्षक आचल दलाल यांच्यातच ती देवी जिवंत आहे.
तूच समाजाची महाकाली, तूच धैर्याची मूर्ती, तूच न्यायाची हमी… तूच!
![]()

