मनोकामना पूर्ण करणारं देवस्थान… पण रस्त्याची दुर्दशा कायम!
खडकाळ, उखडलेले व फुटलेले रस्ते; नवरात्रात भाविकांची कुचंबणा
छावा डिजिटल न्यूज पोर्टल— सचिन मयेकर रेवदंडा—सोमवार —२९ सप्टेंबर २०२५
चोल येथील प्रसिद्ध व पुरातन शितळा देवी मंदिर हे भाविकांचं मनोकामना पूर्ण करणारं देवस्थान म्हणून ओळखलं जातं. वर्षभर हजारो भाविक येथे नवस फेडण्यासाठी, कळे लावण्यासाठी व मनोकामना पूर्ण व्हावी म्हणून दर्शनासाठी येतात. अनेकांना येथे आले की मनोकामना पूर्ण झाल्याचा अनुभव येतो, म्हणूनच या मंदिराबद्दलची श्रद्धा दिवसेंदिवस अधिक दृढ होत आहे.
भाविकांची रांग सतत लागते, त्या ठिकाणी भाविकांची लगबग कायम जाणवते. देवीच्या ओढीने भक्तांचे चेहरे श्रद्धा, आनंद आणि उत्साहाने उजळून निघालेले दिसतात.
मात्र, या मंदिराकडे जाणाऱ्या मार्गाची परिस्थिती अत्यंत खराब आहे. खडकाळ रस्ते, उखडलेले रस्ते आणि फुटलेले रस्ते यामुळे भाविकांना प्रवास करताना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. जणू एखाद्या दुर्गम डोंगरी प्रदेशातून प्रवास करतोय, असा अनुभव येथे येणाऱ्यांना होतो.
सध्या नवरात्र उत्सव सुरू असल्याने या मंगलमय दिवसांत दूरदूरहून भाविक आपल्या वाहनांसह दर्शनासाठी येथे पोहोचत आहेत. पण रस्त्यांची घाणेरडी अवस्था आणि प्रशासनाचं नाकर्तेपण यामुळे भाविकांची कुचंबणा होत आहे. वाहनांना खडकाळ, उखडलेल्या मार्गातून कसरत करावी लागत आहे. प्रवास वेळखाऊ व त्रासदायक ठरत आहे.
तरीदेखील, श्रद्धेच्या बळावर भक्तांची पावलं देवीच्या दिशेने आपोआप वळत आहेत. पण प्रश्न मात्र कायम आहे – भाविकांची ही कुचंबणा थांबवण्यासाठी प्रशासन रस्त्यांच्या कामाला गती कधी देणार??
![]()

