रविवार विशेष—बालिका भविष्यातली दुर्गा
नवरात्रात आपण मूर्ती सजवतो, आरास करतो, आरती करतो पण खरी देवी तर आपल्या घराघरात आहे. ती म्हणजे लहान मुलगी. तिचं गोड हसू, निरागस डोळे, आणि कोवळ्या पावलांचा नाद यातच भविष्यातल्या दुर्गेची चाहूल लागते.
छावा डिजिटल न्यूज पोर्टल— सचिन मयेकर , रेवदंडा—रविवार—२८ सप्टेंबर २०२५
आजही कुठेतरी मुलगी जन्माला आली की तिला ओझं म्हटलं जातं. पण हे समाजाचं सर्वात मोठं चुक आहे. कारण तीच बालिका एक दिवस घर उजळवते, संसार उभा करते, कुटुंबाला धैर्य देते, आणि संपूर्ण समाजाला दिशा दाखवते.
लहान मुलगी म्हणजेच छोट्या देवीचं रूप.
जिच्या कुशीत बाहुल्या असतात, त्या हातात उद्या संसार सांभाळायची ताकद असते.
जिच्या डोळ्यांत निरागस स्वप्नं असतात, त्याच डोळ्यांत उद्या समाज घडवायचं बळ असतं.
आज ती शाळेत अक्षर ओळखते, उद्या तीच मुलगी शिक्षिका बनून इतरांना ज्ञान देईल.
आज ती डॉक्टर-नर्सकडे उपचाराला जाते, उद्या तीच मुलगी शेकडो जीव वाचवेल.
आज ती आईच्या मागे दडते, उद्या तीच मुलगी पोलीस वर्दी घालून गुन्हेगारांना थरथर कापवेल.
म्हणूनच बालिका म्हणजेच भविष्यातली दुर्गा.
आपण कितीही शंका घेतली तरी तिच्या रूपात नऊही देवता दडलेल्या आहेत

बालिका साईशा निलेश चोरघे — हा फोटो त्यांच्या कुटुंबीयांच्या संमतीने वापरलेला आहे. हा फोटो प्रतीकात्मक असून, ‘बालिका : भविष्यातली दुर्गा’ या विचारासाठी सादर केला आहे.”
आई म्हणून अन्नपूर्णा,
शिक्षिका म्हणून सरस्वती,
डॉक्टर म्हणून अंबा,
नर्स म्हणून अन्नपूर्णा,
वकील म्हणून चंद्रघंटा,
समाजसेविका म्हणून अंबिका,
पोलीस म्हणून महाकाली,
ग्रामसेविका म्हणून कुष्मांडा,
आणि घर उजळवणारी लक्ष्मी.
ती आज बालिका आहे, पण उद्या या सर्व रूपांचं मूर्त स्वरूप आहे.
म्हणूनच प्रत्येक बालिकेबद्दल आपली जबाबदारी मोठी आहे.
तिच्या शिक्षणाला प्रोत्साहन द्यायला हवं, तिच्या सुरक्षिततेसाठी आपण सजग राहायला हवं, तिच्या स्वप्नांना पंख द्यायला हवेत.
कारण समाजातली खरी नवरात्रपूजा म्हणजे हीच बालिकेच्या रूपातल्या दुर्गेचा सन्मान.
“माझा जन्म म्हणजे ओझं नाही,
मीच दुर्गामायची शक्ती आहे.
ठेच लागली तर आई म्हणायला आई राहीन,
हातावर राखी बांधायला बहीण राहीन,
आनंद वाटायला सखी राहीन,
आयुष्य उजळवायला भावजय राहीन,
आणि वाईट काळात खांद्याला खांदा लावून लढायला पत्नी राहीन.”
ही ओळ प्रत्येक बालिकेच्या अस्तित्वाचं सार सांगते. ती आहे म्हणून घर आहे, ती आहे म्हणून समाज आहे, ती आहे म्हणून संस्कृती टिकून आहे.
आज तिचं रुप निरागस आहे, पण उद्या तिचं रुप रौद्र होईल.
आज ती खेळणी सांभाळते, पण उद्या तीच समाज सांभाळेल.
आज ती अभ्यास करते, पण उद्या तीच न्याय देईल.
आज ती शाळेत नाचते-गाते, पण उद्या तीच रणांगणात तलवार उगारणार आहे.
खरी जिवंत देवी मूर्तीमध्ये नाही, तर या लहानग्या बालिकेत आहे.
तिचा सन्मान करा, तिचं रक्षण करा, तिच्या स्वप्नांना पंख द्या.
कारण आज ती बालिका आहे, पण उद्या तीच दुर्गामाय आहे.
💐 खरी जिवंत देवी तीच जी आज बालिका म्हणून आपल्या कुशीत खेळते, पण उद्या समाज बदलणारी दुर्गा म्हणून उभी राहते. 💐
![]()

