खरी जिवंत देवी — ग्रामपंचायतीत कमला सुवर्णा आणि रुग्णालयात सेवामयी नर्स कोमल पवार..
सूचना : हा लेख “खरी जिवंत देवी!” हा फक्त स्त्रीशक्तीचा गौरव करण्यासाठी आहे. येथे घेतलेली नावे केवळ उदाहरणादाखल असून, समाजातील सर्वच स्त्रिया देवीच्या रूपात वंदनीय आहेत. कोणाच्याही भावना दुखवण्याचा आमचा हेतू नाही.
तूच घराची लक्ष्मी, तूच समाजाची सेवा करणारी कमला, तूच सेवामयी अन्नपूर्ण तूच रुग्णांच्या डोळ्यात आशा पेरणारी,
छावा डिजिटल न्यूज पोर्टल— सचिन मयेकर , रेवदंडा शनिवार २७ सप्टेंबर २०२५
खरी जिवंत देवी – कमला देवी सुवर्णा जोएल उंदीर

एका स्त्रीच्या खांद्यावर किती जबाबदाऱ्या असतात हे सांगायला शब्द अपुरे पडतात. घर, संसार, लेकरं, नोकरी, समाज — या सगळ्यांना एकाच वेळी सांभाळणं म्हणजे खरी कसोटी. पण ही कसोटी ज्या सहजतेने पार पडते, तेच स्त्रीचं सामर्थ्य आहे. ग्रामपंचायतीत काम करणारी कमला सुवर्णा जोएल उंदीर ह्या त्याचं जिवंत उदाहरण आहेत. त्यांना नुकताच काही महिन्यांचा मुलगा आहे. पण तरीही त्या घरातल्या प्रत्येक कामाची जबाबदारी निभावतात — लेकराची काळजी, संसाराची देखभाल, घरच्यांच्या गरजा. आणि हे सगळं उरकून त्या वेळेवर ऑफिसात पोहोचतात. ग्रामपंचायतीचं काम म्हणजे सामान्य लोकांच्या समस्या सोडवणं, अर्ज निपटवणं, योजना राबवणं, दैनंदिन कारभार नीट करणं — हे सगळं काटेकोरपणे सांभाळणं.सुवर्ण मॅडम हे काम नेहमी तितक्याच तत्परतेने करतात. गावातील लोकांना त्यांचं वागणं, बोलणं, आणि काम करण्याची शैली मनाला भावते. त्यांचं नावच जणू त्यांच्या व्यक्तिमत्त्वाशी जुळतं. “कमला” या देवीच्या शब्दाचा अर्थ आहे कमळ फूल — निर्मळतेचं आणि पवित्रतेचं प्रतीक.तसंच “कमला” हे देवी लक्ष्मीचं नाव आहे — घरासाठी सौभाग्य आणि समृद्धीचं रूप.जशी लक्ष्मी घराला ऐश्वर्य देते, तशीच सुवर्ण मॅडम आपल्या घरासाठी, लेकरासाठी आणि गावासाठी समृद्धी निर्माण करतात.अशा वेगवान धावपळीमध्ये एकदा ऑफिसमधून उतरताना पायऱ्यांवर पाय सटकल्यामुळे त्यांना दुखापत झाली आणि थोडं फ्रॅक्चरही झालं. पण आश्चर्य म्हणजे, या प्रसंगानं त्यांच्या कामाची उमेद कमी झाली नाही.त्यांच्या चेहऱ्यावर थकवा नाही, उलट अधिक आत्मविश्वास दिसतो. कारण त्यांना ठाऊक आहे लोकांचा विश्वास, गावाचा कारभार आणि लेकराचं भवितव्य त्यांच्याशी जोडलेलं आहे.स्त्रियांना देवी का म्हटलं जातं याचं खरं उत्तर अशा स्त्रियांमध्ये दडलं आहे.ज्या एका दिवसात आई, गृहिणी, कर्मचारी, समाजसेवक या सर्व भूमिका निभावतात, ज्या दुखापत झाल्यावरही कामावरची निष्ठा डळमळत नाही त्या खऱ्या अर्थानं “खऱ्या जिवंत देवी” आहेत. कमला देवी चे रूप म्हणजे सुवर्णा जोएल उंदीर आणि यांचा हा त्याग, मेहनत आणि निष्ठा फक्त त्यांच्या लेकराला नव्हे, तर संपूर्ण समाजाला प्रेरणा देणारी आहे.
नर्स :कोमल सचिन पवार— आरोग्यदायिनी देवी
रुग्णालय म्हणजे वेदना, अश्रू आणि भीतीचं स्थान. पण त्या सगळ्यात आशेचा किरण दाखवणारी व्यक्ती म्हणजे नर्स. इंजेक्शन द्यायचं, औषधं द्यायची, ड्रेसिंग करायचं एवढंच नाही, तर रुग्णाच्या अंगावर हात ठेवून दिलेला धीर, “काही होणार नाही, मी आहे ना तुझ्या सोबत” असं कानातलं वाक्य हेच खरं औषध ठरतं. कोमल सचिन पवार, स्टाफ नर्स, अलिबाग सिव्हिल हॉस्पिटल या अशाच आरोग्यदायिनी देवी आहेत. रुग्णालयात आलेल्या कित्येक रुग्णांना त्यांनी नवा श्वास दिला, कोणाच्या जखमांतून रक्त थांबलं असेल तर त्यांची काळजी घेतली, तर कोणाच्या डोळ्यात हरवलेली आशा परत पेटवली. रुग्णालयात अनेकदा डॉक्टरांचा चेहरा दिसत नाही, पण २४ तास रुग्णांसोबत राहून त्यांना उभं करणारी व्यक्ती म्हणजे नर्स. तिच्या चेहऱ्यावरील स्मितहास्य आणि मायेने बोललेलं एक वाक्य रुग्णासाठी आयुष्यभर विसरण्यासारखं नसतं. म्हणूनच म्हणावं लागतं डॉक्टर जीव वाचवतात, पण नर्स जीवन जगवतात. कोमल पवार सारख्या नर्स म्हणजेच खरी आरोग्यदायिनी देवी आहेत.
![]()


