दीड महिना बेपत्ता… सिद्धीचा ठावठिकाणा अजूनही गूढच..

मुंबई-गोरेगाव येथील २९ वर्षीय सिद्धी दिलीप काटवी हिचा आजवर काहीच ठावठिकाणा लागलेला नाही. नोव्हेंबर २०२४ पासून ती रेवदंडा येथील नारायण आळीतील ‘नारायण लीला’ बिल्डिंगमधील एका ब्लॉकवर वास्तव्यास होती.

छावा डिजिटल न्यूज पोर्टल — सचिन मयेकर रेवदंडा —शुक्रवार २६ सप्टेंबर २०२५

६ ऑगस्ट २०२५ रोजी तिचे आई-वडील तिला भेटायला आले असता सिद्धी घरात आढळली नाही. तिचा मोबाईलदेखील बंद असल्याने तातडीने शोधमोहीम सुरू करण्यात आली. तथापि, दीड महिना उलटून गेला तरी ठोस धागा मिळालेला नाही आणि या घटनेने परिसरात संभ्रम व चिंता पसरली आहे.

प्राप्त माहितीनुसार, शोधमोहीम अनेक दिशांनी राबवली जात आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासणे, मोबाईल कॉल-लॉग आणि लोकेशन पडताळणे, संबंधित व्यक्तींशी चौकशी करणे तसेच संशयास्पद ठिकाणांची तपासणी करणे असे प्रयत्न सुरू आहेत. लवकरच काही निष्कर्ष मिळेल अशी अपेक्षा पोलिसांनी व्यक्त केली आहे.

तक्रारीत वडिलांनी नमूद केले आहे की सिद्धीची मानसिक स्थिती स्थिर नव्हती आणि ती अनेकदा चिडचिड करीत असे. या परिस्थितीचा कोणी तरी गैरफायदा घेतल्याची शंका व्यक्त केली जात आहे. नेमका कोण हा “महिषासुर” आहे किंवा त्यामागे कोणती टोळी आहे, याचा शोध पोलीस तपासात घेत आहेत.

तिने दररोज ज्या वाहनाने फिरायची त्या वाहनाच्या चालकाचीही चौकशी करण्यात आली असून, त्या संदर्भात तपशीलवार विचारपूस चालू असल्याची माहिती मिळाली आहे. पोलिस सूत्रांच्या म्हणण्यानुसार, सर्व शक्य तत्त्वांचा गांभीर्याने आढावा घेण्यात येत आहे.

दरम्यान, नवरात्रीच्या सणात देवीची पूजा होत असताना एका कुटुंबातील जिवंत देवी ठावठिकाणाविना आहे, ही बाब समाजाला विचार करायला लावणारी ठरते. आरत्या, ढोल-ताशांच्या गजरात आपण देवीचा गौरव करतो; परंतु खरी स्त्री-शक्ती सुरक्षित आहे का, हा प्रश्न पुन्हा एकदा उभा राहतो.

सिद्धीचे आई-वडील आता थेट पोलीस ठाण्यात जाऊन तपासाला वेग देण्याची मागणी करत आहेत. “शेवटी ती आमची मुलगी आहे, तिचा शोध लागलाच पाहिजे,” असे ते भावूक होऊन सांगतात. गावातही या वेदनेबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.

सिद्धी काटवीबाबत कोणालाही काही माहिती मिळाल्यास तातडीने रेवदंडा पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सिद्धी, तू कुठेही असशील, जिथे असशील तिथून परत ये. आम्हाला थेट कॉन्टॅक्ट कर तू  परत ये. आम्ही तुझी वाट पाहतो आहोत.” आई-वडील

कितीही चर्चा, कितीही तर्क… पण शेवटी ती एक मुलगी आहे. तिचं पुढे काय झालं हे समजलं नाही तोवर हा प्रश्न अनुत्तरितच राहील. दीड महिना उलटून गेला तरी तिचा ठावठिकाणा लागत नाही  ही फक्त एका कुटुंबाची वेदना नाही तर संपूर्ण समाजासाठी गंभीर इशारा आहे.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *