रेवदंडा बाजारपेठेत खोट्या शंभर रुपयांच्या नोटांचा प्रकार; व्यापाऱ्यांमध्ये सावधतेची चर्चा
रेवदंडा बाजारपेठेत खोट्या शंभर रुपयांच्या नोटांचा वापर करून माल खरेदी करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बाजारपेठेत एक महिला कलर झेरॉक्स काढलेल्या शंभर रुपयांच्या नोटा देऊन खरेदी करीत होती.
छावा डिजिटल न्यूज पोर्टल सचिन मयेकर रेवदंडा रविवार, २१ सप्टेंबर २०२५
या खोट्या नोटांचा फटका बाजारपेठेतील दोन दुकानदारांना बसला असून, आणखी एका हार विक्रेत्यालाही अशाच प्रकारे फसवण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती आहे. संबंधित दुकानदारांनी आपली नावे जाहीर न करण्याची विनंती केली आहे.एका व्यापाऱ्याच्या म्हणण्यानुसार, ही महिला बाजारातील ओळखीची नव्हती. माझ्या दुकानात खरेदी करून गेल्यानंतर नोट तपासताना ती खोटी असल्याचं लक्षात आलं. फसवणूक केवळ शंभर रुपयांची नाही, तर ती दिलेल्या खोट्या नोटेबरोबर दुकानातील वस्तू घेऊन गेल्याने नुकसान अधिकच झाले आहे.विशेष म्हणजे, यापूर्वीही रेवदंडा बाजारपेठेत आर्थिक फसवणुकीची घटना घडली होती. एका आरोपीने खोटं बोलून आणि योजना आखून मोबाईलमधून पैसे पाठवल्याचा भास निर्माण करून तब्बल साडेसात हजार रुपयांचा स्पीकर घेतला होता. या प्रकरणी रेवदंडा पोलिसांनी तातडीने कारवाई करून आरोपीला शिताफीने पकडून अटक केली होती.या पार्श्वभूमीवर व्यापारी असोसिएशनकडून तातडीचे आवाहन करण्यात आले आहे.
सावधान ! सावधान !! सावधान !!!
सर्व व्यापारी बांधवांनी सावध राहावे की आपल्या बाजारपेठेमध्ये एक स्त्री शंभर रुपयाच्या खोट्या नोटा घेऊन बाजारपेठेमध्ये खरेदीसाठी फिरत आहे. तरी कोणाकडूनही शंभरच्या नोटा घेताना सर्वांनी अतिशय सावधानता बाळगावी. शंभर रुपयाची नोट झेरॉक्स काढलेली आहे. कृपया सर्वांनी सावधानता बाळगावी, ही नम्र विनंती.
![]()

