रविवार विशेष — समुद्र नव्हे तर स्वराज्याचा कवच – महाराजांचे दूरदृष्टीचे धोरण

सागरी सुरक्षा चषक कबड्डी स्पर्धेच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला वंदन करण्यात आले. हा क्षण फक्त परंपरेचा नव्हता, तर आपल्या इतिहासातील एका खोल सत्याची आठवण करून देणारा होता.

रेवदंडा  — सचिन मयेकर, ‘छावा’ डिजिटल न्यूज पोर्टल. १४ सप्टेंबर २०२५

साडेतीनशे वर्षांपूर्वी महाराजांनी ज्या समुद्रकिनाऱ्यावर स्वराज्याची पताका फडकवली, त्याच किनाऱ्यांवर आज कबड्डी सामन्यांचा जल्लोष होत आहे. मुघलांचा क्रूर अन्याय, औरंगजेबाचा दहशतीचा कारभार, तसेच पोर्तुगीज-ब्रिटिशांचा वसाहतवाद या सर्वांविरुद्ध छत्रपती शिवाजी महाराज उभे ठाकले आणि केवळ गडकोट नव्हे तर सुरक्षित सागरी तटबंदीचीही संकल्पना भारताला दिली.

सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, प्रतापगड यांसारखे किल्ले उभारून त्यांनी दाखवून दिले की जो सागर जिंकतो, तोच साम्राज्य जिंकतो. महाराजांनी सागराला केवळ व्यापाराचा किंवा प्रवासाचा मार्ग न मानता स्वराज्याच्या संरक्षणाचा आधारस्तंभ मानले.

आज या कबड्डी स्पर्धेत प्रथम वंदन महाराजांना करण्यात आलं, ते केवळ स्मरण नव्हतं, तर आपल्या पिढीला दिलेला संदेश होता  की सागरावर लक्ष ठेवणं, एकत्र राहणं आणि समन्वयातून सुरक्षा उभारणं हे आपलं सामूहिक कर्तव्य आहे.

प्रत्येक सामन्यातील शिट्टी, प्रत्येक खेळाडूचा झुंजार खेळ, मच्छीमार बांधवांची उपस्थिती आणि पोलीस-सागर सुरक्षा दलाचा सहभाग  हे सारे महाराजांच्या शाश्वत विचारांचेच पुढे चाललेले प्रतिबिंब आहे.

समुद्र हा केवळ अन्नदाता नाही, तर तो स्वराज्याचा कवच आहे.

आणि म्हणूनच आज किनाऱ्यावर घुमणाऱ्या जयघोषातून जणू महाराजांचा तोच आवाज ऐकू येतो

सावध राहा, सज्ज राहा… कारण स्वराज्य अजूनही सागरकाठावर उभं आहे.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *