रेवदंडा पोलीस ठाणे हद्दीत अपघात बुलेटस्वारावर गुन्हा दाखल

आज दि. 12 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी साधारण 12 वाजण्याच्या सुमारास बारशिव–काशीद रस्त्यावरील खिंडीत एस.टी. बस व बुलेटचा अपघात झाला. या घटनेत बुलेटस्वार तरुण गंभीर जखमी झाला आहे.
सचिन मयेकर, ‘छावा’ डिजिटल न्यूज पोर्टल. १२ सप्टेंबर २०२५
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी गजानन किसनराव मोरे (वय 39, रा. विलेगाव ता. अहमदपूर, जि. लातूर) हे त्यांच्या ताब्यातील एस.टी. बस (क्र. MH-14/MH-3882) प्रवाशांसह रेवदंडा बाजूकडून मुरुडकडे घेऊन जात होते. यावेळी समोरून येणारी बुलेट (क्र. MH-06-CT-4943) भरधाव वेगात व चुकीच्या बाजूने येऊन बसला धडकली.
या धडकेत बुलेटस्वार आरोपी कल्पेश गोपीनाग देवघरे (वय 37, रा. दिघी सर्वे, ता. श्रीवर्धन, जि. रायगड) गंभीर जखमी झाला असून त्याच्या उजव्या गुडघ्याला तसेच दोन्ही हातांना दुखापत झाली आहे. तसेच अपघातात बुलेट व एस.टी. बसचे नुकसान झाले आहे.
या घटनेप्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. 114/2025, भा.न्या. संहिता 2023 चे कलम 125(अ), 125(ब), 281 व 184 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत किरवले करीत आहेत.