रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला तीन राष्ट्रीय पुरस्कारांचा मान

रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने 2024–25 या आर्थिक वर्षात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे एकाच वेळी तीन नामांकित पुरस्कार जिंकले आहेत.
सचिन मयेकर, ‘छावा’ डिजिटल न्यूज पोर्टल. ११ सप्टेंबर २०२५
गोव्यात 17 व 18 सप्टेंबर रोजी होणाऱ्या समारंभात गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि देशाच्या सहकार क्षेत्रातील वरिष्ठ व्यक्तिमत्त्व, नॅशनल फेडरेशन ऑफ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक अँड क्रेडिट सोसायटीचे चेअरमन ज्योतींद्र मेहता यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.
बँकेच्या काटेकोर कर्जवसुली धोरणामुळे व थकबाकी नियंत्रणातील शिस्तबद्धतेमुळे तिला “बेस्ट एनपीए मॅनेजमेंट” हा पुरस्कार मिळाला आहे. माहिती तंत्रज्ञानात सुरक्षित गुंतवणूक करून सायबर सुरक्षेची प्रभावी अंमलबजावणी केल्यामुळे बँकेला बेस्ट सेक्युरिटी ऑपरेशन सेंटर तर लेखापरीक्षण प्रक्रियेत आधुनिक तंत्रांचा वापर करून पारदर्शकता, कार्यक्षमता आणि जोखीम व्यवस्थापनात झालेल्या सुधारांमुळे “बेस्ट ऑडिट ट्रान्सफॉर्मेशन” हा पुरस्कार घोषित झाला आहे. हे पुरस्कार देशातील नामवंत संस्था एफसीबीए यांच्या वतीने जाहीर करण्यात आले आहेत.
अलीकडेच झालेल्या बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आर्थिक कामगिरीचे महत्त्वाचे तपशील सादर करण्यात आले. बँकेचा ढोबळ नफा 85.80 कोटी तर निव्वळ नफा 35.59 कोटी इतका झाल्याची माहिती देण्यात आली. यावेळी सभासदांना 12.5 टक्के लाभांश जाहीर करण्यात आला. बँकेच्या निधीने 700 कोटींचा टप्पा पार केला असून, तो 2030 पर्यंत 1000 कोटींपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तसेच पुढील दोन वर्षांत बँकेचा व्यवसाय दहा हजार कोटी रुपयांवर नेण्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.
या यशाबद्दल बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक म्हणाले की, हे पुरस्कार म्हणजे आपल्या कामगिरीला मिळालेली मोठी दाद आहे. ग्राहकांचा विश्वास, अध्यक्ष जयंत पाटील व संचालक मंडळाचे मार्गदर्शन, तसेच अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मेहनतीमुळेच हे यश शक्य झाले.
बँकेचे अध्यक्ष जयंत पाटील यांनीही आनंद व्यक्त करताना सांगितले की, ग्राहकांचा वाढता विश्वास आणि बँकेच्या व्यवसायातील झपाट्याने झालेली वाढ हीच खरी आपली खरी संपत्ती आहे. आज मिळालेल्या पुरस्कारांनी रायगड जिल्हा बँकेच्या सहकार क्षेत्रातील भूमिकेला अधिक अधोरेखित केले आहे.