चंद्रग्रहण : शास्त्र, श्रद्धा आणि अंधश्रद्धा

छावा वाचकांसाठी खास सूचना
चंद्रग्रहण ही एक नैसर्गिक घटना आहे. त्याला घाबरण्याचे काही कारण नाही. आपण श्रद्धेने पूजा करू शकता, पण अंधश्रद्धेला बळी पडू नका. आजचा लालसर चंद्र हा निसर्गाचा अद्भुत खेळ आहे नक्की अनुभव घ्या.
सचिन मयेकर, ‘छावा’ डिजिटल न्यूज पोर्टल ०७ सप्टेंबर २०२५
आज रात्रीचा चंद्रग्रहण विशेष आहे. भारतासह जगभरात हे खग्रास चंद्रग्रहण दिसणार असून रात्री आकाशात लालसर रंगाचा चंद्र झळकताना दिसेल. यालाच लोक रेड मून किंवा ब्लड मून म्हणतात.
रेड मून म्हणजे काय?
ग्रहणाच्या वेळी पृथ्वी सूर्य आणि चंद्र यांच्या मध्ये येते. सूर्यप्रकाश थेट चंद्रावर पोहोचू शकत नाही, पण पृथ्वीभोवतीच्या वातावरणातून वाकून काही किरणं चंद्रावर पडतात. त्या किरणांमधला लालसर भाग जास्त प्रमाणात पोहोचतो, म्हणून चंद्राचा रंग लालसर दिसतो.
हा कोणताही “अपशकुन” नसून केवळ प्रकाशशास्त्रातील (Optics) घटना आहे.
त्यामुळे चंद्र लाल दिसला की घाबरण्याचे काही कारण नाही.
आजच्या चंद्रग्रहणाची वेळ (७ सप्टेंबर २०२५)
ग्रहणाची सुरुवात : रात्री ९:५८ वाजता
पूर्ण ग्रहण (ब्लड मून) : रात्री ११:०० वाजता
मध्यकाळ (शिखर) : रात्री ११:४२ वाजता
ग्रहण समाप्ती : पहाटे १:२६ (८ सप्टेंबर)
एकूण कालावधी : सुमारे ३ तास ३० मिनिटे
चंद्रग्रहण हा एक नैसर्गिक खगोलीय खेळ आहे.
दरवर्षी अशा घटना घडतात आणि याचा पृथ्वीवरील दैनंदिन जीवनावर काही अपायकारक परिणाम होत नाही.
खगोलशास्त्रज्ञ, संशोधक आणि आकाश निरीक्षकांसाठी ही एक अप्रतिम संधी असते.
आपल्या धर्मशास्त्रात चंद्रग्रहणाला एक विशेष स्थान दिलं गेलं आहे.
सुतक काळ : ग्रहणाच्या आधीपासूनच काही धार्मिक आचार-नियम पाळले जातात. पूजा, अन्न सेवन, शुभकार्य टाळले जातात.
मंत्रजप : या काळात मंत्रजप आणि ध्यान केल्यास पुण्य प्राप्त होते अशी धारणा आहे.
देवमूर्तींची सेवा : अनेक ठिकाणी देवतांना वस्त्र झाकून ठेवतात आणि ग्रहणानंतर स्नान करून पुनःप्राणप्रतिष्ठा करतात.
अंधश्रद्धा – काय खरं, काय नाही?
ग्रहणाच्या वेळी अनेक अंधश्रद्धा पसरलेल्या आहेत
गर्भवती स्त्रियांनी घराबाहेर पडू नये, अन्यथा मूलाला दोष होतो.
ग्रहणात अन्न खाल्लं तर विष होतं.
ग्रहणकाळात जन्मलेलं मूल अशुभ असतं.
या सगळ्याला कोणताही वैज्ञानिक आधार नाही.
डॉक्टर्स सांगतात की प्रसूती वा उपचार ग्रहणामुळे थांबवणे धोकादायक आहे.
अन्न ग्रहणात खराब होत नाही, जर झाकून ठेवलं तर काही हरकत नसते.
ग्रहण हा फक्त आकाशातील प्रकाश-छायांचा खेळ आहे.
श्रद्धा आणि शास्त्राचा समन्वय
श्रद्धा ही आपल्या संस्कृतीचा भाग आहे, त्यामुळे पूजा, जप, उपवास हे व्यक्तिगत आस्थेचे विषय आहेत.
पण अंधश्रद्धेमुळे जीव धोक्यात घालणे, भीती पसरवणे योग्य नाही.
शास्त्र सांगते की हे ग्रहण एक नैसर्गिक घटना आहे अभ्यासासाठी, निरीक्षणासाठी आणि सौंदर्यासाठी.
चंद्रग्रहण म्हणजे निसर्गाचा थाटमाट
आज रात्री नक्की आकाशात नजर टाका, लालसर रंगाचा चंद्र अनुभवायला मिळेल.
श्रद्धा ठेवायची की नाही, तो प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय. पण अंधश्रद्धेला बळी पडू नका. शास्त्रानं सांगितलेलं सत्य आणि आपल्या परंपरेत सांगितलेले नियम दोन्हींचा समन्वय साधला तरच खरी जाणीव होईल.