रविवार विशेष _विशाळगड गाठला – सिद्धीचा स्वप्नभंग

सन १६६०.
पन्हाळगडावर छत्रपती शिवाजी महाराज अडकले होते. सिद्धी जोहराच्या फौजेनं गडाला कडेकोट वेढा घातला होता. रसद संपली, मावळे उपाशी, मुसळधार पावसाचा कडकडाट.
सचिन मयेकर, ‘छावा’ डिजिटल न्यूज पोर्टल ०७ सप्टेंबर २०२५
पन्हाळा हा दक्षिण महाराष्ट्र–कर्नाटक मार्गावर नियंत्रण ठेवणारा महत्वाचा किल्ला. महाराज इथे आले कारण स्वराज्याचा डावपेच इथून मजबूत होत होता. पण वेढा कडवट झाला. आणि महाराजांना उमगलं – “शिवाजी जिवंत म्हणजे स्वराज्य जिवंत!”
म्हणून गड सोडून विशाळगड गाठणं आवश्यक होतं.
शिवरायांनी गनिमी कावा रचला.
शिवा काशीद नावाचा मावळा, रूपाने महाराजांसारखाच दिसणारा, पालखीत बसवला गेला.
सिद्धीच्या सैनिकांनी ती पालखी पकडली. आनंदाने “शिवाजी महाराज मिळाले!” असं समजून तो छावणीत आणला.
सिद्धी संतापून म्हणाला
हसता क्यों है काफ़िर? तुझे मालूम नहीं, अब तेरी गर्दन उड़ा दी जायेगी.
त्यावर शिवा शांतपणे हसून म्हणाला
शिवाजी महाराज बनकर मरना पड़े,
तो इससे बड़ा सौभाग्य और क्या हो सकता है.
क्षणात त्याचा शिरच्छेद झाला.
पण या बलिदानामुळे खरी पालखी पुढे सरकत राहिली, आणि महाराज सुटले.
पावनखिंडीत रणतांडव
पावसाचा प्रचंड मारा, चिखलाने भरलेला घाट, आकाशात वीजांचे तडाखे.
मागून हजारो शत्रू पाठलाग करत होते.
तेव्हा बाजीप्रभू देशपांडे खिंडीसमोर उभे ठाकले.
त्यांनी छातीठोक आवाज दिला
महाराज, तुम्ही विशाळगड गाठा. तोवर या खिंडीतून एकही शत्रू पार होणार नाही. तोफेचा आवाज झाला, की समजा तुम्ही पोहोचलात. माझा जीव ढाल होईल.
हजारो शत्रूंची फौज चिखल उडवत आली.
आणि बाजीप्रभू, मुठभर मावळ्यांसह, त्यांच्यावर सिंहासारखे तुटून पडले.
हर हर महादेव
रणांगण थरारून गेलं.
तलवारी वीजेसारख्या कडकडल्या. रक्ताचा पाऊस खिंड लाल करत होता.
पण मावळे ढालीसारखे उभे होते.
तोफेचा आवाज आणि अमर बलिदान
तासन्तास तांडव सुरू होतं.
बाजीप्रभूंचं शरीर जखमी झालं होतं, रक्तबंबाळ अवस्थेतही ते तलवार फिरवत होते.
शेवटी दूरवरून तोफेचा आवाज घुमला
महाराज विशाळगडावर सुखरूप पोहोचल्याचा तो संकेत.
तोफेचा गडगडाट ऐकून बाजींच्या चेहऱ्यावर स्मित आलं.
त्यांनी शेवटचा श्वास घेताना कुजबुजलं
महाराज पोहोचले… स्वराज वाचलं.
इतकं भयंकर तांडव पाहून सिद्धी जोहरही उद्गारला
काश! हमारे पास भी ऐसे सैनिक होते.
महाराज जेव्हा विशाळगडावर पोहोचले, तेव्हा तिथेही संकट थांबले नव्हते.
किल्ल्याच्या तटावर तैनात असलेल्या काही मावळ्यांनी शत्रूच्या भीतीनं किंवा द्रोहामुळे महाराजांना आत घेतलं नाही.
क्षणभर महाराजांना स्वतःच्याच लोकांशी झुंज द्यावी लागली.
ही होती इतिहासातील सर्वात वेदनादायी गोष्ट स्वराज्याचे शत्रू फक्त बाहेर नव्हते, तर आतही होते.
पण अखेरीस खरी ओळख पटली.
तोफांचा आवाज, बाजीप्रभूंचं बलिदान आणि निष्ठावंत मावळ्यांच्या आघाडीमुळे महाराज सुरक्षित गडावर प्रवेशले.
सिद्धीचा स्वप्नभंग
सिद्धीचं सैन्य थकून भागलं.
हजारो सैनिक पडले, रसद संपली, मनोधैर्य कोलमडलं.
महाराज विशाळगडावर पोहोचले, आणि सिद्धीचा डाव चुराडा झाला.
आदिलशाही दरबारात त्याची थट्टा झाली.
त्याची प्रतिष्ठा उडाली, सामर्थ्य संपलं.
आणि काही वर्षांत त्याचा अंत झाला.
शिवा काशीदाचं बलिदान, बाजीप्रभूंचं रणतांडव आणि मावळ्यांची निष्ठा यामुळेच स्वराज्य वाचलं.
पण या प्रवासाने दाखवून दिलं की फितुरी किती घातक ठरू शकते.
आजही पावनखिंडीत उभं राहिलं की डोळ्यांसमोर रक्ताचा पाऊस दिसतो, आणि कानावर घुमतो
“हर हर महादेव!”