दिवीवाडी महाजनेत धक्कादायक खून : नायलॉनच्या रशीतून गळा आवळून हत्या

अलिबाग तालुक्यातील दिवीवाडी महाजने गावात पुन्हा एकदा खूनाची धक्कादायक घटना घडली आहे. दिनांक १ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री आठ वाजल्यापासून ते २ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
सचिन मयेकर – छावा डिजिटल न्यूज पोर्टल ०६ सप्टेंबर २५
या प्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपी दत्ताराम नागू पिंगळा (वय ३८, रा. गंगेची वाडी, पोस्ट रामराज, ता. अलिबाग, जि. रायगड) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०३(१) अन्वये कारवाई सुरू आहे.
दत्ताराम पिंगळा हा याआधीही खूनाच्या गुन्ह्यात दोषी ठरला असून रेवदंडा पोलीस ठाण्यातील गुन्हा रजि. नं. ३३/२०१८ भारतीय दंड संहिता कलम ३०२ अंतर्गत जन्मठेपेची शिक्षा झाली होती. मात्र एप्रिल २०२४ मध्ये तो अपील जामिनावर बाहेर आला. सन २०१८ मध्ये अर्चना चंद्रकांत नाईक हिच्याशी असलेल्या प्रेमसंबंधांमुळे तिच्या काकांचा खून करून तो तुरुंगात गेला होता.
सजा भोगून बाहेर आल्यानंतर आरोपी दत्ताराम पिंगळा दिवीवाडी महाजने येथे आला. फिर्यादीची बहीण अर्चना चंद्रकांत नाईक (वय ३६) हिच्याशी तो बोलत असताना त्यांच्यात वाद निर्माण झाला. या वादातून संतापून आरोपीने घरातील नायलॉनच्या रसीचा वापर करून अर्चनाचा गळा आवळला व तिचा जागीच खून केला.
या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत किरवले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.