मराठा हक्काचा विजय जरांगे पाटील भावूक आंदोलनाला पूर्णविराम

मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानात पाच दिवसांपासून उपोषणाला बसलेले मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपलं आंदोलन मागे घेतलं. राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने आरक्षणाबाबतचा मसुदा सादर केला आणि झालेल्या चर्चेनंतर जरांगे पाटील यांनी उपोषण सोडण्याचा निर्णय घेतला.
मुंबई, २ सप्टेंबर (PTI) २०२५
मराठा मंत्रिमंडळ उपसमितीचे प्रमुख राधाकृष्ण विखे पाटील आणि समितीतील इतर सदस्यांनी जरांगे पाटील यांची मनधरणी करण्यात यश मिळवलं. सरकारने त्यांच्या आठ मागण्यांपैकी सहा मागण्या मान्य केल्याची घोषणा केली. त्यानंतर सरकारच्या शिष्टमंडळाच्या विनंतीवरून जरांगे पाटील यांनी ज्यूस प्राशन करून उपोषण मागे घेतलं.
जरांगे पाटील यांनी इच्छा व्यक्त केली होती की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री प्रत्यक्ष उपस्थित असावेत. मात्र शिष्टमंडळाने घेतलेले निर्णय हे तिन्ही नेत्यांच्या मार्गदर्शनाखालीच झाले असल्याचं स्पष्ट करण्यात आलं. त्यानंतर त्यांनी उपोषण सोडलं.
उपोषण संपतानाचा क्षण भावनिक ठरला. आझाद मैदान गुलालाने, जल्लोषाने आणि जयघोषाने दुमदुमून गेलं. जरांगे पाटील यांच्याही डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. शिष्टमंडळाने आणि हजारो आंदोलकांनी त्यांचं जोरदार स्वागत व अभिनंदन केलं.
२९ ऑगस्टपासून जरांगे पाटील उपोषणावर बसले होते. या काळात महाराष्ट्रातील हजारो मराठा बांधव मुंबईत दाखल झाले. दक्षिण मुंबईतील रस्ते आंदोलकांनी व्यापले होते. अनेकांसाठी ही पहिलीच मुंबईची भेट होती. मुसळधार पावसाने सुरुवातीचे दिवस कठीण केले, पण आंदोलक ठामपणे जरांगे पाटील यांच्या पाठीशी उभे राहिले. शेवटी त्यांचा संघर्ष व्यर्थ गेला नाही आणि सरकारला झुकावं लागलं.
दरम्यान, मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं महायुतीचं सरकार महाराष्ट्रातील कुठल्याही वंचित घटकावर अन्याय करणार नाही. मराठा समाजाच्या प्रश्नाचं महाविकास आघाडीने राजकारण केलं, पण आम्ही ठाम उत्तर दिलं. आज जरांगे पाटील समाधानी झाले आणि त्यांनी उपोषण मागे घेतलं, ही महत्त्वाची बाब आहे.