लहानग्याचे निरागस कुतूहल – बाप्पा परत घरी

आजच्या विसर्जनप्रसंगी भाविकांना चिखलामुळे मोठी पायपीट करावी लागली. अनेकांनी बाप्पाच्या विसर्जनासाठी किलोमीटर चालत मोठ्या मेहनतीने समुद्रकिनाऱ्यापर्यंत वाट काढली. या कठीण पायपिटीमध्ये एक हृदयस्पर्शी आणि कौतुकास्पद घटना घडली.
सचिन मयेकर,‘छावा’ पोर्टल २८ ऑगस्ट २०२५
घरच्यांसोबत एक लहानगा मुलगाही आनंदाने विसर्जनाच्या यात्रेत सामील झाला होता. मोठ्या बाप्पाच्या मिरवणुकीत तो स्वतःच्या हातात एक छोटी बाप्पाची मूर्ती घेऊन चालला होता. कोणालाही न सांगता, नकळत त्याने ही मूर्ती घरून सोबत आणली होती. त्याच्या चेहऱ्यावर उत्साह होता, पण विसर्जनाच्या क्षणी मात्र त्याचे डोळे पाणावले.
मोठ्या बाप्पाचे विसर्जन जसे पार पडले तसे वातावरण घोषणांनी, ढोल-ताशांनी आणि आरत्यांनी भारावले होते. पण हा लहानगा मात्र आपल्या हातातील लहान बाप्पाकडे निरखून पाहत होता. त्याच्या मनाने बाप्पाला निरोप देण्यास नकार दिला. अखेर त्याने छोटा बाप्पा पुन्हा आपल्या मिठीत घेतला आणि “हा माझा बाप्पा माझ्यासोबतच राहणार” या निरागस भावनेने घरी घेऊन गेला.
ही घटना पाहून अनेक भाविकांचे डोळे भरून आले. लहानग्याच्या निरागसतेतून बाप्पावरील प्रेम आणि भक्तीचा खरा अर्थ सर्वांना उमगला.