गणेशोत्सवाचा मूळ पाया – कारागीरांचा घाम

गणेशोत्सवाचा जल्लोष महाराष्ट्रभर ओसंडून वाहतो. सार्वजनिक मंडळे, घराघरांत आरास, गजर, भजन, पूजनाची धामधूम दिसते. पण या उत्सवाच्या पाया घालणाऱ्या कारागिरांकडे समाजाकडून फारसं लक्ष जात नाही. मूर्ती घडविणाऱ्यांचा घाम, त्यांचा संघर्ष आणि त्यांच्या घरातील संकटं हाच या सणाचा खरा पाया आहे.
सचिन मयेकर, संपादकीय ‘छावा’ पोर्टल २७ ऑगस्ट २०२५
मातीचा एक ढिगारा हातात घेऊन कारागीर गणरायाचं रूप घडवायला सुरूवात करतो. त्याच्या बोटांनी जणू जीव निर्माण होतो. चेहऱ्यावरील भाव, डोळ्यांतील तेज, हातातील करंगळीची वळणं प्रत्येक गोष्ट रेखताना त्याला किती संयम लागतो! दिवस-रात्र झोपेचा त्याग करून, हातावर फोड उठवूनही तो काम करतो. कारण त्याच्यासाठी मूर्ती ही केवळ मातीची शिल्पकृती नसते, ती असते भक्ताच्या श्रद्धेचं प्रतीक.
परंतु या प्रवासात संकटं कमी नाहीत. एखादी चूक झाली, धक्का लागला, तर महिन्यांचा परिश्रम पाण्यात जातो. पावसाळ्यात ओलसरपणा, रंग वाळायला वेळ लागणे, कधी साहित्य मिळण्यात अडथळे — तरीही कारागीर हार मानत नाही. त्याचं मन सतत सांगतं, ‘गणराया भक्तांसमोर सुंदरतेनं उभा राहायलाच हवा.’
आज आपण घराघरांत बाप्पाची स्थापना करताना त्या मूर्तीसमोर नम्रतेनं हात जोडतो. पण या नम्रतेसोबत एका क्षणासाठी मूर्तीमागील कारागिरांचं स्मरण होणं ही खरी भक्ती ठरेल. त्यांच्या घामाशिवाय, त्यांच्या श्रमाशिवाय हा सणच अपूर्ण आहे.
गणराय आपल्याला प्रत्येक वर्षी नवा उत्साह देतो, पण या कलाकारांना समाजाने केवळ सणापुरते नव्हे, तर वर्षभर सन्मान देणं हीच खरी कृतज्ञता ठरेल.
कारागिरांच्या हातून घडलेल्या मूर्तीमुळेच गणेशोत्सवाला खऱ्या अर्थाने ‘जीव’ मिळतो. या कलाकारांना आपण मनःपूर्वक सॅल्यूट करायला हवा.