पर्यूषण पर्व – क्षमायाचनेचा महापर्व

पर्यूषण पर्व हा जैन समाजाचा सर्वात मोठा आणि पवित्र सण आहे. हा सण फक्त आनंद साजरा करण्यापुरता मर्यादित नसून, तो आत्मशुद्धीचा आणि आत्मपरीक्षणाचा पर्व आहे. पर्यूषणाला क्षमापणा पर्व असेही म्हटले जाते.
सचिन मयेकर – छावा न्यूज पोर्टल २७ ऑगस्ट २५
जैन धर्म शिकवतो की – क्षमाविना साधना अपूर्ण आहे. म्हणूनच या दिवशी प्रत्येक जण आपल्या मन, वचन आणि कर्माने केलेल्या चुका मान्य करून क्षमा मागतो. लहान–मोठ्या प्रत्येक जीवाला, आप्तेष्टांना, नातेवाईकांना आणि सर्व समाजाला नम्रतेने क्षमा मागून हा दिवस साजरा केला जातो.
पर्यूषण हा केवळ धार्मिक विधींचा उत्सव नसून, तो आपल्या अंतरंगातील अहंकार, मत्सर, राग, द्वेष यांचा त्याग करून आत्म्याला शुद्ध करण्याचा महायज्ञ आहे. वर्षभर नकळत घडलेल्या पापांची कबुली देऊन, सर्वांना मोकळ्या मनाने क्षमा मागणे हीच खरी साधना मानली जाते.
या पर्वाचे मंगल वचन आहे
मिच्छामी दुक्कडम्
(अर्थ: माझ्याकडून जर काही चुकीचे झाले असेल तर मला क्षमा करा).
आजच्या वेगवान जीवनशैलीत पर्यूषण पर्व आपल्याला थांबून आत्मपरीक्षण करण्याची आणि सर्वांशी सौहार्दाने वागण्याची शिकवण देतो. खरेच, जिथे क्षमा आहे, तिथेच खरी शांती आणि खरी मोक्षप्राप्ती आहे.