रेवदंडा बाजारात पावसामुळे गणेश खरेदीला अडथळा.

उद्या गणेश आगमन होणार असल्याने देवबाप्पासाठी लागणारे पूजेचे साहित्य, रोषणाईची साधने, फळं, फुलं–हार, कपडे आदी खरेदीसाठी रेवदंडा बाजारपेठेत भाविकांची लगबग सुरू आहे. मात्र हवामानाने या खरेदीत खोडा घातला आहे.

सचिन मयेकर – छावा न्यूज पोर्टल २६ ऑगस्ट २५

काल दिवसभर कोसळलेल्या पावसामुळे खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची पांगापांग झाली. तर आज, गणपतीच्या आदल्या दिवशीही सकाळपासूनच पावसाची जोरकस हजेरी लागल्याने खरेदीत मोठा अडथळा निर्माण झाला. तरीदेखील भाविकांची खरेदीसाठी गर्दी दिसून आली, मात्र पडत्या पावसामुळे ग्राहक–भाविकांची प्रचंड गैरसोय झाली.

अलिकडच्या काळात रेवदंडा जवळील वावे येथे मोठी बाजारपेठ उभी राहिल्याने तसेच इतर परिसरातही गणेशोत्सवाकरिता स्वतंत्र बाजार भरत असल्याने रेवदंडा बाजारातील गणपती खरेदी आधीसारखी मोठ्या प्रमाणावर होत नाही. त्यात पावसाचा अडथळा आल्याने खरेदी आणखीच मंदावली.

परिसरातून मोठ्या प्रमाणावर बाजारात आणलेली फळं, भाज्या तसेच बाप्पाच्या पूजेसाठी लागणारी फुलं–हार पावसामुळे भिजून खराब होण्याची किंवा वेळेवर न विकल्यास फेकून द्यावी लागण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे व्यापाऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे.

गणेशोत्सव अगदी दारात असताना झालेल्या या अडथळ्यामुळे सणाची खरेदी काही काळासाठी खंडित झाली असून, हवामानाची अनिश्चितता भाविक–व्यापाऱ्यांसाठी मोठे आव्हान ठरत आहे.

दरम्यान, कोरलई येथील क्रिश्चन समाजातील महिला डोंगरउतारांवर काकडी, जिबूड, मुळा, दुधी व इतर भाज्या–फळांची लागवड करतात. जून महिन्यात त्यांनी पिकांची लागवड केली असली तरी सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे विशेषत: जिबूड या फळावर रोगांचा प्रादुर्भाव होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *