रेवदंडा रस्त्यावर धोक्याचे खड्डे – गणेशोत्सवात नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका.

रेवदंड्यातील पारनाका परिसरात रस्त्यावर झालेले खड्डे नागरिकांसाठी अक्षरशः धोक्याचे जाळे बनले आहेत. रस्त्याच्या मधोमध उघड्या तोंडाने उभे असलेले हे खड्डे चारचाकी, दुचाकीच नव्हे तर पायी चालणाऱ्यांच्याही जीवाला धोका ठरत आहेत. छोटे–मोठे अपघात घडत असून, कधीही गंभीर दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सचिन मयेकर – छावा न्यूज पोर्टल २३ ऑगस्ट २५
सार्वजनिक बांधकाम खाते झोपेत, नागरिक संतापले
सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी अक्षरशः झोपेत आहेत, असा संताप नागरिकांनी व्यक्त केला आहे. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. विशेष म्हणजे गणपती बाप्पाच्या आगमनाच्या मिरवणुका आणि मूर्ती विसर्जन सोहळ्यांसाठी याच मार्गाचा वापर होतो. मग हजारो भाविकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोण घेणार? हा प्रश्न नागरिकांच्या ओठांवर आहे.
आगारकोट किल्ल्याजवळ धोक्याचा वळसा
आगारकोट किल्ल्याजवळील रस्ता तर अधिकच धोकादायक बनला आहे. अपघाती वळण आणि त्यावरच खड्ड्यांचे साम्राज्य… वाहनांचा ताबा सुटून मोठ्या दुर्घटना घडण्याचा गंभीर धोका कायम आहे. पर्यटकांची मोठी वर्दळ असणाऱ्या या किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर अपघात झाल्यास परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.
बाजारपेठेतील वाढती गर्दी – उपाययोजना तातडीची
रेवदंडा बाजारपेठेत आधीच मोठी गर्दी होत असून, गणेशोत्सव काळात ही गर्दी आणखी वाढणार आहे. गर्दीच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावर पडलेले खड्डे वाहतुकीला गंभीर अडथळा निर्माण करत आहेत. अशा स्थितीत नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी व वाहतुकीच्या सुरळीत व्यवस्थेसाठी तातडीने उपाययोजना होणे गरजेचे आहे, अशी मागणी जोर धरत आहे.
संतापाचा ज्वालामुखी फुटण्याच्या तयारीत
सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने खड्ड्यांची दुरुस्ती केली नाही, तर नागरिक रस्त्यावर उतरून संतापाचा ज्वालामुखी फोडतील. त्यावेळी जबाबदारी थेट सार्वजनिक बांधकाम विभागावर येणार आहे, असा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे.
—