पिठोरी अमावस्या – मातृशक्तीचा सन्मान

श्रावण महिन्यातील अमावस्येला ‘पिठोरी अमावस्या’ म्हणतात. हिंदू संस्कृतीत या दिवसाला अत्यंत महत्त्व आहे. पिठोरी या नावामागे पिठाच्या मातृकांच्या मूर्ती घडवण्याची प्रथा आहे.
सचिन मयेकर – छावा न्यूज पोर्टल-२२ ऑगस्ट २५
स्त्रिया आपल्या लेकरांच्या दीर्घायुष्य, आरोग्य आणि समृद्धीसाठी या दिवशी उपवास करतात, पिठाच्या मातृका घडवून त्यांचे पूजन करतात. म्हणूनच हा दिवस मातृत्वाच्या अखंड शक्तीचा उत्सव मानला जातो.
पुराणांमध्ये वर्णन आहे की या दिवशी सोळा मातृकांचे पूजन करावे. या मातृका म्हणजे बालकांच्या रक्षणासाठी कार्यरत असलेल्या अदृश्य शक्ती. गव्हाचे, भगरचे किंवा तांदळाच्या पिठाचे सोळा मातृकांचे स्वरूप घडवले जाते. काही ठिकाणी गणेशाची प्रतिमाही घडवली जाते. त्या मातृकांना फुलं, हळद-कुंकू, अक्षता वाहून नैवेद्य दाखवला जातो. रात्री त्यांच्या मूर्तींचं विसर्जन केलं जातं.
या परंपरेमागील संदेश हा केवळ धार्मिक नाही, तर सामाजिक आणि कौटुंबिकही आहे. आई आपल्या लेकरांसाठी करीत असलेली प्रार्थना हीच खरी ‘पिठोरी अमावस्या’. अनेक ठिकाणी या दिवशी मुलींना किंवा सुना-बाळंतिणींना ओटी दिली जाते, घरी बोलावून सन्मान केला जातो. त्यामुळे या दिवशी कुटुंबीयांमध्ये एकोपा वाढतो.
आजच्या धकाधकीच्या आयुष्यात या परंपरा जपणं गरजेचं आहे. कारण यातून आपल्याला आईच्या ममतेची जाणीव, मातृत्वाची ताकद आणि संततीप्रेमाची ऊब मिळते. पिठोरी अमावस्येचा खरा अर्थ म्हणजे आईच्या मायेचा आणि तिच्या रक्षणकर्त्या शक्तीचा सन्मान.
आईच्या डोळ्यांतून उमटणाऱ्या प्रार्थनेत लेकरांचं आयुष्य सुरक्षित राहतं, आईच्या ओटीतून मिळणाऱ्या आशीर्वादात संपूर्ण घराचं भाग्य उजळतं. म्हणूनच
आई म्हणजे देवतेचं मूर्तिमंत रूप,
पिठोरी अमावस्या म्हणजे तिच्या शक्तीला केलेलं नमन.