मोदी सरकारचा मोठा निर्णय – पैसे लावून खेळल्या जाणाऱ्या ऑनलाइन गेम्सवर संपूर्ण बंदी.

भारताच्या संसदेत २१ ऑगस्ट रोजी पारित झालेल्या Promotion and Regulation of Online Gaming Bill, 2025 मुळे देशभरातील लाखो तरुणांना हादरवणारा धडाकेबाज निर्णय घेण्यात आला आहे.
सचिन मयेकर – छावा न्यूज पोर्टल-२२ ऑगस्ट २५
आता पुढे Dream11, MPL, Rummy, Poker, My11Circle यांसारखे पैसे लावून खेळले जाणारे सर्व ऑनलाइन गेम्स संपूर्णपणे बंदीस्त झाले आहेत.
सरकारने या निर्णयामागे स्पष्ट केलेले कारण म्हणजे तरुणांमध्ये वाढत चाललेले व्यसन, कर्जबाजारीपणा आणि आत्महत्यांचे प्रकार. केंद्र सरकारने थेट संसदेतूनच हा कायदा पास करून कंपन्यांना धक्का दिला आहे.
कंपन्यांचा मोठा धक्का
Dream11, MPL सारख्या दिग्गज कंपन्यांनी आधीच त्यांचे “real-money” गेम्स थांबवण्यास सुरुवात केली आहे.
Nazara Technologies सारख्या गुंतवणूकदार कंपन्यांना तब्बल ₹८०० कोटींचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
स्टॉक मार्केटमध्येही घसरणीचे सावट — काही कंपन्यांच्या शेअर्सनी २०% पेक्षा जास्त घसरण अनुभवली आहे.
हा कायदा फक्त कंपन्यांनाच नाही तर क्रिकेट विश्वालाही मोठा धक्का देणार आहे.
BCCI ला Dream11 आणि My11Circle सारख्या कंपन्यांकडून मिळणारा स्पॉन्सरशिपचा आधार आता संपणार.
₹१७,००० कोटींपर्यंतची जाहिरात व मार्केटिंगची बाजारपेठ कोसळेल, ज्यामध्ये धोनी, शुभमन गिल, आमिर खान यांसारख्या नामवंत व्यक्तींचा समावेश आहे
शिक्षा आणि दंड
या नवीन कायद्यानुसार, जर कोणी पैसे लावून ऑनलाइन गेम चालवताना आढळला तर मोठा दंड व तुरुंगवास ठोठावला जाणार आहे. सरकारने याबाबत कोणतीही तडजोड न करण्याचा निर्णय घेतला आहे.
सरकारची भूमिका
केंद्र सरकार म्हणते, “रिअल-मनी गेम्सना पूर्णविराम देणे गरजेचे होते. पण ई-स्पोर्ट्स आणि सोशल गेमिंगला आम्ही प्रोत्साहन देणार आहोत. यासाठी एक राष्ट्रीय आयोग स्थापन केला जाईल.”
विरोधकांचा आरोप
विरोधकांनी मात्र या निर्णयावर कडाडून टीका केली आहे. “बंदी हा उपाय नाही, नियमन करणे गरजेचे होते. आता लोक बेकायदेशीर साईट्सकडे वळतील,” अशी प्रतिक्रिया काँग्रेससह इतर नेत्यांनी दिली.
हा कायदा म्हणजे एक प्रकारचा धडाकेबाज सरकारी हल्ला आहे ज्यामुळे संपूर्ण ऑनलाइन गेमिंग उद्योग ढवळून निघाला आहे.
एकीकडे सरकार जनतेला व्यसनमुक्तीचे कारण सांगत आहे, तर दुसरीकडे हजारो तरुणांचे रोजगार आणि कोट्यवधींचे गुंतवणूक धोक्यात आली आहे.