युवा महोत्सवात जे. एस. एम.चा दबदबा

मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागातर्फे आयोजित ५८ व्या रायगड (दक्षिण विभाग) युवा महोत्सवात जे. एस. एम. कॉलेजने दणदणीत कामगिरी करत रायगड झोन चॅम्पियनशिपवर आपली छाप उमटवली.
अलिबाग | विशेष प्रतिनिधी | १९ ऑगस्ट
२५ स्पर्धांमध्ये ३३ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून त्यापैकी तब्बल १५ स्पर्धांमध्ये पारितोषिके पटकावत जे. एस. एम.च्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचा झेंडा उंचावला.
ही जिल्हास्तरीय फेरी अंजुमन-इस्लाम जंजिरा डिग्री कॉलेज ऑफ सायन्स, मुरुड-जंजिरा येथे पार पडली. कोलाज, चित्रकला, पोस्टर मेकिंग, वकृत्व (मराठी), कथाकथन (हिंदी), वादविवाद (मराठी), एकांकिका (मराठी) व एकपात्री अभिनय (हिंदी) या स्पर्धांमध्ये महाविद्यालयाने प्रथम क्रमांक मिळवला. तर कथाकथन (मराठी), तालवाद्यवादन, मूकाभिनय, भारतीय समूहगीत गायन यामध्ये द्वितीय, नाट्यसंगीतमध्ये तृतीय क्रमांक मिळवला. वादविवाद (हिंदी/इंग्रजी) व लोकनृत्य यामध्ये उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.
कु. श्रेया अधिकारी (टी.वाय.बी.ए.-मराठी) हिने पाच स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन पाचही स्पर्धांमध्ये पारितोषिक मिळवत वैयक्तिक पातळीवरही घवघवीत यश संपादन केले.
या कामगिरीबद्दल जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड. गौतम पाटील, उपाध्यक्ष डॉ. साक्षी पाटील, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सोनाली पाटील, उपप्राचार्य डॉ. प्रवीण गायकवाड, जिल्हा समन्वयक प्रा. जयेश म्हात्रे व सांस्कृतिक कार्यक्रम समन्वयक प्रा. श्वेता पाटील यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत विद्यापीठस्तरीय अंतिम फेरीसाठी शुभेच्छा दिल्या.
या यशामागे संघ व्यवस्थापक म्हणून प्रा. डॉ. सिमंतीनी ठाकूर, प्रा. अश्विनी आठवले, प्रा. विनायक साळुंके, प्रा. हर्षला महाजन, प्रा. प्रीतम सातुपे, प्रा. सुरभी वाणी आणि प्रा. हिमांशू कुलकर्णी यांचे योगदान महत्त्वाचे ठरले. सांस्कृतिक समितीतील सर्व सहकारी प्राध्यापकांच्या सहकार्याने हा विजय अधिक भक्कम झाला.