मिठेखारचा डोंगर गिळतोय जीव..वृद्ध महिला जागीच ठार

७५ वर्षीय विठाबाई गायकरांचा दरडीखाली दुर्दैवी मृत्यू; ग्रामस्थांचा प्रशासनाला घेराव
सचिन मयेकर, छावा – मिठेखार | १९ ऑगस्ट २०२५
रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाने अक्षरशः थैमान घातले असून, जिल्हा प्रशासनाने ज्या गावांना दरड प्रवण ग्रस्त म्हणून घोषित केले आहे, त्यातीलच मुरुड तालुक्यातील मिठेखार या गावात आज सकाळी भीषण घटना घडली.
सकाळी साडेआठच्या सुमारास विक्रम बिर्ला गणेश मंदिरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मिठेखार गावात डोंगरातून कोसळलेल्या मातीच्या ढिगाऱ्याने गावातील दुकानाच्या भिंतीवर तडाखा दिला. भिंत कोसळून ७५ वर्षीय विठाबाई मोतिराम गायकर या जागीच दबून ठार झाल्या. अचानक घडलेल्या या दुर्घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
जुने जखमा आणि दुर्लक्षलेली आश्वासने!
मिठेखार हा गाव दरडीच्या छायेत असून, यापूर्वी २०१९ सालीसुद्धा येथे मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले होते. त्यावेळी तत्कालीन कोकण आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी स्वतः गावात येऊन पाहणी केली होती, तसेच सुरक्षितता भिंत बांधण्याचे आदेश दिले होते. मात्र पाच वर्ष उलटली तरी ती भिंत गायब आहे – कोणी खाल्ली, कोणी गिळली याचा मागमूस नाही!
ग्रामपंचायतीने गेल्यावर्षीही सार्वजनिक बांधकाम विभागास पुन्हा पत्र दिले होते, पण नेहमीप्रमाणे ती पत्रे फाइलमध्ये गाडली गेली. ग्रामस्थांचा आक्रोश असा की – शासन नेहमी फक्त आश्वासनं देतं, पण वेळ येताच ते मृतदेहांवर पांघरूण घालण्यासाठीच पोहोचतं.
प्रशासनाला ग्रामस्थांचा घेराव
घटनेची माहिती मिळताच रेवदंडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत किरविले घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर अलिबागचे उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण, मुरूड तहसिलदार आवेश डफळ, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मंगेश पाटील, अभियंता आशिष मुकणे आदी अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
मात्र संतप्त ग्रामस्थांनी या अधिकाऱ्यांना चांगलाच घेराव घालत “दरडीखाली दबून माणसं मरतात आणि तुम्ही फक्त आश्वासनं देता! सुरक्षित घरं कधी मिळणार?” असा जाब विचारला.
या दरम्यान शिवसेना (उबाठा) जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे, माजी जि.प. सदस्या राजश्री मिसाळ, मानसी दळवी तसेच भाजप जिल्हा सरचिटणीस अॅड. महेश मोहिते हेही घटनास्थळी दाखल होऊन ग्रामस्थांना धीर देण्याचा प्रयत्न करत होते. उपस्थित अधिकारी यांनी तत्काळ शासकीय मदतीचा धनादेश जाहीर केला, मात्र तो तात्पुरता मलमपट्टीसारखा असल्याची टीका ग्रामस्थांनी केली.
स्थलांतराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
दरडीखाली विठाबाई गायकरांचा मृत्यू झाल्यानंतर ग्रामस्थांची मागणी एकच – “फक्त मदतीचे धनादेश नकोत, कायमस्वरूपी स्थलांतर द्या!”. कारण आज विठाबाई गेल्या, उद्या आणखी किती घरं गिळणार हा डोंगर?
जिल्ह्यात अशा अनेक घटना घडल्या, शेकडो लोकांनी आपला जीव गमावला. मात्र शासनाचे अधिकारी आणि नेते फक्त दु:ख व्यक्त करून, फोटो काढून आणि घोषणा करून परत जातात