रायगडमध्ये रेड अलर्टचा तडाखा – रेवदंड्यात जुन्या घराचा भाग कोसळला!

अतिवृष्टीमुळे आगर आळीतील मंगेश विश्वनाथ लाड यांच्या घराला मोठं नुकसान जीवितहानी टळली
सचिन मयेकर, छावा – रेवदंडा | १९ ऑगस्ट २०२५
रयगड जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेला रेड अलर्ट लागू आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी नद्या-नाले ओसंडले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.
या अतिवृष्टीचा फटका रेवदंडा शहरालाही बसला आहे. रेवदंडा आगर आळी येथे मंगेश विश्वनाथ लाड यांचे जुने घर आहे. मुसळधार पावसामुळे या घराचा वॉशरूम आणि बाथरूमचा भाग कोसळला असून मोठे खिंडार पडले आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
घरात सहा लोक वास्तव्य करीत असून सुदैवाने सर्वजण सुरक्षित बचावले आहेत. परंतु घराचा मागचा भाग पडल्याने हे घर आता धोकादायक स्थितीत आले आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला तातडीने पंचनामा करून मदत मिळावी अशी मागणी केली आहे.
रयगडमध्ये आजही पावसाचा जोर कायम – IMDचा रेड अलर्ट!
१९ ऑगस्ट रोजी शाळांना सुट्टी; नद्या-नाले ओसंडले, पुराचा गंभीर धोका
रयगड जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोर आज, मंगळवार दिनांक १९ ऑगस्ट रोजीही कायम असून भारतीय हवामान विभागाने (IMD) जाहीर केलेला रेड अलर्ट लागू आहे. सलग मुसळधार पावसामुळे जिल्हाभरातील नद्या-नाले ओसंडून वाहत आहेत आणि पुराचा धोका अधिकच गंभीर बनला आहे.
जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून आज सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. अनेक रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली असून ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे
प्रशासनाने नागरिकांना आज दिवसभर फक्त अत्यावश्यक कारणासाठीच बाहेर पडावे असे स्पष्ट आवाहन केले आहे.
सखल भागातील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलविण्याची कार्यवाही सुरू आहे.
आपत्कालीन नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत असून मदतकार्य दल सज्ज ठेवण्यात आले आहेत.
मुंबई, ठाणे आणि पुणे जिल्ह्यांमध्येही आज पावसाचा जोर कायम असून तिथेही रेड अलर्ट लागू आहे. मुंबईत गेल्या दोन दिवसांत ५०० मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. अंधेरी सबवे व उपनगरातील अनेक भागांमध्ये पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.