हुतात्मा शेषनाथ वाडेकरांचे स्मारक झुडपात गाडलेले – स्वातंत्र्यवीराचा अपमान, प्रशासन झोपेत.

दिनांक : १७ ऑगस्ट २०२५
सचिन मयेकर – छावा न्यूज पोर्टल-रेवदंडा
स्वातंत्र्य म्हणजे केवळ राजकीय सत्ता मिळवणं नाही, तर मातृभूमीसाठी प्राणार्पण करण्याची तयारी. अशा तयारीने १९५५ मध्ये गोवा मुक्तीसंग्रामात रक्त सांडून तिरंगा फडकवणारे रायगडातील शूरवीर हुतात्मा शेषनाथ वाडेकर आज इतिहासाच्या पानावर अजरामर आहेत. पण दुर्दैवाने, रेवदंड्यात उभारलेले त्यांचे स्मारक आज झुडपांत गाडले गेले असून, संपूर्ण परिसर घाणीच्या साम्राज्यात अडकलेला आहे.
रेवदंड्यातील स्मारकाची दयनीय अवस्था
रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील रेवदंडा गावातील थेरोंडा खंडेराव पाडा येथे वाडेकर यांचे वडिलोपार्जित घर आहे. ह्याच ठिकाणाच्या जवळ, रेवदंडा हायस्कूलच्या पाठीमागे त्यांचे भव्य स्मारक उभारलेले आहे.
पण आज त्या स्मारकाकडे पाहिलं की संताप अनावर होतो
स्मारकाभोवती काटेरी झुडपे, रानटी झाडं, घाण आणि दुर्गंधी पसरली आहे.
परिसरात कुत्र्यांचे वास्तव्य झाले आहे.
आतल्या भागात शेषनाथ वाडेकर यांची तसबीर धूळ, कोळिष्टके, मकडीचे जाळे आणि घाणीमध्ये गाडली गेली आहे.
छप्पर खराब असून, साफसफाईचा लवलेशही नाही.
दोन वर्षांपूर्वी स्मारकाच्या पाठीमागून आग लागली होती. पोलीसांनी तातडीने धाव घेऊन आग विझवली, अन्यथा स्मारक राख झाले असते.
ध्वजस्तंभ आणि दीपस्तंभाची दुर्दशा
स्मारकासमोर उभारलेला ध्वजस्तंभ एकेकाळी ध्वजारोहणाचा साक्षीदार होता. पण आज तो पूर्णपणे विद्रूप झाला आहे. रंग उडून गेला आहे, गंज चढला आहे आणि त्यावर बाहेरून एक बांबू बांधलेला दिसतो. ग्रामस्थ सांगतात कदाचित कपडे
टांगण्यासाठी वापर केला जात असावा! म्हणजेच, शूरवीराच्या सन्मानाचा इतका घोर अपमान होत आहे.
एवढेच नव्हे, तर बाजूला असलेला मोठा दीपस्तंभ सुद्धा मोठ्या-मोठ्या झाडांच्या फांद्यांनी झाकून गेला आहे.
वर चढण्यासाठी असलेले गज गंजून झाकले गेले असून, तो दीपस्तंभ आज ओळखूही येत नाही.
प्रशासनाची झोप मोडावी लागेल!
हा सगळा नजारा पाहून प्रश्न पडतो –
गोव्यात पोर्तुगीजांच्या गोळीबाराला छाती देऊन झेंडा फडकवणाऱ्या शूरवीराला आपण असा अपमान द्यायचा का?
आज स्मारक गचाळ अवस्थेत, झुडपांमध्ये गाडलेलं आणि कुत्र्यांचं निवासस्थान झालेलं दिसतंय, ही प्रशासनाची लाज नाही का?
ग्रामस्थ आणि इतिहासप्रेमींचा स्पष्ट सूर आहे –
हुतात्मा शेषनाथ वाडेकर हे फक्त रेवदंड्याचे नाहीत, ते संपूर्ण महाराष्ट्राचे आणि भारताचे अभिमान आहेत. त्यांच्या स्मारकाची अशी दुर्दशा होऊ देणार नाही. शासनाने तातडीने स्मारकाची दुरुस्ती, स्वच्छता आणि सुशोभीकरण करावं. अन्यथा आंदोलन अपरिहार्य आहे.
शेषनाथ वाडेकर – स्वातंत्र्याचा शौर्यदीप
स्वातंत्र्यवीर वाडेकर यांच्या बलिदानामुळे आज गोवा भारताचा भाग आहे. पण त्यांचे स्मारक जर अशा अवस्थेत कुजत बसले, तर पुढच्या पिढ्यांना कोणती प्रेरणा मिळणार?
हा स्वातंत्र्याचा दीप पुन्हा तेजोमय करणे ही आता प्रशासनाची जबाबदारी आहे.
हुतात्मा शेषनाथ वाडेकर – गोवा मुक्तीसंग्रामातील एक अजरामर नाव
स्वातंत्र्य म्हणजे केवळ राजकीय स्वातंत्र्य नव्हे, तर मातृभूमीसाठी प्राण अर्पण करण्याची ती अखंड तयारी. अशाच निष्ठावान, नि:स्वार्थ आणि निर्भय लढवय्यांच्या शौर्यकथेत एक नाव अमर आहे हुतात्मा शेषनाथ वाडेकर.
बालपण ते सामाजिक कार्य
१५ ऑगस्ट १९१४ रोजी मुंबईत जन्मलेले शेषनाथ वाडेकर यांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर आपल्या मूळ गावी रेवदंडा, रायगड येथे पाऊल ठेवले. नंतर कामानिमित्त ते थेरोंडा गावी आले, जिथे त्यांच्या वडिलोपार्जित घरात ते वास्तव्यास होते.
सामाजिक जाण व लोकाभिमुख विचारसरणीमुळे ते परिसरातील कोळी बांधवांचे अत्यंत लाडके कार्यकर्ते बनले. त्या काळात लोकांना तांदळाची टंचाई भासत असताना, त्यांनी तांदूळ मिळवून देण्यासाठी मोठा प्रयत्न केला आणि लोकांच्या पोटापाण्याची सोय केली.
गोवा मुक्तीसंग्रामात प्रवेश
शेषनाथ वाडेकर यांचा स्वातंत्र्यलढ्यातील प्रवास गोवा मुक्तीसंग्रामाने नव्या उंचीवर पोहोचला. हिरवे गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली १९५५ मध्ये त्यांनी टेरिकोल किल्ल्यावर झेंडा फडकवण्याच्या सत्याग्रहात सहभाग घेतला. हा सत्याग्रह पूर्णपणे अहिंसक होता आणि त्यात १२७ कार्यकर्त्यांचा समावेश होता.
सत्याग्रहींचा ताफा किल्ल्याकडे जात असताना, पोर्तुगीज सैनिकांनी त्यांना अडवले आणि निर्दयपणे गोळीबार सुरू केला. या गोळीबारात हिरवे गुरुजी धारातीर्थी पडले. त्या क्षणी, जखमी असूनही, शेषनाथ वाडेकर यांनी हिरवे गुरुजींकडील तिरंगा उचलला आणि न डगमगता किल्ल्यावर चढून झेंडा फडकवला.
शौर्याचा शेवट
झेंडा फडकवल्यानंतर पोर्तुगीजांनी त्यांना लक्ष्य करून पुन्हा गोळ्या झाडल्या. गंभीर जखमी अवस्थेतही त्यांनी हार मानली नाही त्यांना जायबंदी केले व बॉर्डर सील केली. त्यातच अखेर तेही मातृभूमीसाठी शहीद झाले. त्यांच्या मृत्यूनंतर पोर्तुगीजांनी त्यांच्या कुटुंबियांना पार्थिव देण्यास नकार दिला आणि उलट त्यांचे कुटुंब संपविण्याचा प्रयत्न केला — हा त्या काळातील निर्दयी कारभाराचा जिवंत पुरावा आहे.
स्मारक आणि गौरव
आज गोव्यातील टेरेकोल किल्ल्याजवळ हुतात्मा शेषनाथ वाडेकर आणि हिरवे गुरुजी यांच्या स्मृतीसाठी भव्य स्मारक उभारलेले आहे. महाराष्ट्र शासनाने राज्याच्या गॅझेटियरमध्ये त्यांच्या बलिदानाची अधिकृत नोंद केली आहे. हे स्मारक केवळ दगडांचे बांधकाम नाही, तर स्वातंत्र्यासाठी रक्त सांडणाऱ्या प्रत्येक हृदयाची कहाणी सांगणारा एक जिवंत दस्तऐवज आहे.
वारसा आणि कुटुंब
शेषनाथ वाडेकर हे केवळ एक नाव नाही, तर धैर्य, निष्ठा आणि स्वातंत्र्याच्या अमर ज्वालेचे प्रतीक आहेत. कोळी बांधवांचे प्रिय कार्यकर्ते, तांदळासाठी लढणारा जनतेचा नेता आणि अखेर आपल्या भूमीच्या मुक्तीसाठी प्राणार्पण करणारा योद्धा — या सर्व रूपांनी ते आपल्या स्मृतीत सदैव जिवंत राहतील.
त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा २०२३ मध्ये वारला असून, दोन मुलींपैकी एक मुलगी वारली आहे. सध्या त्यांची सुनबाई सरिता वाडेकर आणि दुसरी मुलगी, नातू असा परिवार आहे. टेरिकोल किल्ल्यावर फडकवलेला तो झेंडा आजही त्यांच्या शौर्याचा साक्षीदार आहे.