अलिबाग तुंबापुरी! मुसळधार पावसाने शहर ठप्प

दिनांक : १६ ऑगस्ट २०२५
लेखक : सचिन मयेकर – छावा न्यूज पोर्टल
गेल्या दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे अलिबाग शहर अक्षरशः ‘तुंबापुरी’ झाले आहे. रस्त्यांवर गाड्या पाण्यात गटांगळ्या खाताना दिसत आहेत. चारचाकी वाहनांचे दरवाज्यापर्यंत पाणी पोहोचल्याने वाहनधारकांची पंचाईत झाली. पाण्यातून गाड्या जाताना लाटांसारख्या लाटा उठत होत्या, जणू काही समुद्राच्याच लाटा शहरात उसळत आहेत, असे दृश्य पाहावयास मिळाले.
वाहतूक विस्कळीत
पाण्यामुळे शहरातील वाहतूक कोलमडली आहे. वाहनचालक व पादचारी यांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. काही ठिकाणी दुचाकी रस्त्यातच बंद पडल्याने वाहतूक कोंडी झाली.
महेश टॉकीजमध्ये पाणी घुसलं
शहरातील मुख्य करून पी.एन.पी. परिसर आणि महेश टॉकीज भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. एवढंच नव्हे तर महेश टॉकीजच्या आतच पाणी शिरलं. त्यामुळे टॉकीज मालक आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना स्वतः मशिनरी लावून पाणी बाहेर काढावं लागलं.
नालेसफाई आणि पाणी निचरा यंत्रणा वेळेवर झाली असती तर व्यापाऱ्यांना असा त्रास सहन करावा लागला नसता, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
हॉस्पिटलमध्येही पाणी शिरले
प्रशासनाच्या बेफिकीरपणामुळे आणि नालेसफाईच्या अभावामुळे परिस्थिती एवढी बिघडली की शहरातील हॉस्पिटलमध्येही पाणी शिरले. उपचारासाठी आलेल्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना अक्षरशः पाण्यातूनच जावे लागले. रुग्णालयाच्या कक्षांमध्ये आणि कॉरिडॉरमध्ये साचलेल्या पाण्यामुळे मोठा गोंधळ उडाला.
पाण्याचा निचरा होईना म्हणून अखेर रुग्णालय प्रशासनानेही मशिन लावून पाणी बाहेर काढण्याची वेळ आली. या दरम्यान हॉस्पिटलमधील आरोग्य यंत्रणेवर ताण आला आणि काम करणाऱ्या डॉक्टर, नर्सेस, कर्मचाऱ्यांची एकच तारांबळ उडाली. रुग्णसेवेसारख्या अत्यावश्यक कामावर थेट परिणाम झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
नागरिकांचे म्हणणे आहे की, “दरवर्षी अशा घटना घडतात. पण हॉस्पिटलसारख्या संवेदनशील ठिकाणी जर पाणी शिरून उपचार अडथळ्यांत आले, तर हे प्रशासनासाठी आणि लोकप्रतिनिधींसाठी लाजिरवाणं आहे.
ठिकठिकाणी तुंबलेलं पाणी
शहरातील प्रमुख चौक, रहदारीची ठिकाणे, तसेच वस्ती परिसरात पाणी साचून लोकांना दैनंदिन कामकाजात अडथळे आले. गाड्या अक्षरशः बुडाल्यासारख्या दिसत होत्या.
नागरिकांची नाराजी
दरवर्षी पावसाळा आला की हीच अवस्था. प्रशासन पाणी निचरा यंत्रणेवर लक्ष देत नाही. निवडून आलेले लोकप्रतिनिधी प्रशासनाला जबाबदार धरण्यात कमी पडत आहेत. त्यामुळे व्यापारी आणि नागरिकांना स्वतः मशिनरी लावून पाणी काढावं लागतं. ही लाजिरवाणी परिस्थिती आहे,अशा प्रतिक्रिया नागरिकांनी दिल्या.