पोलिसांच्या पोशाखातला ‘लहानसा शूरवीर’ – ध्वजारोहण सोहळ्याचा आकर्षणबिंदू.

दिनांक : १५ ऑगस्ट २०२५
रेवदंडा – सचिन मयेकर – छावा न्यूज पोर्टल
स्वातंत्र्य दिनाचा तो मंगलमय क्षण… रायगड जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळा, पागार मोहल्ला येथे तिरंग्याचा मानाचा झेंडा फडकत होता. देशभक्तीच्या गीतांनी वातावरण भारावले होते. या दरम्यान सर्वांचे लक्ष वेधून घेणारा एक वेगळाच पाहुणा उपस्थित होता पोलिस इन्स्पेक्टर च्या पोशाखातील लहानसा, गोडसा ‘छोटा माही’ यासीन मुकादम!
अगदी टापटीप युनिफॉर्म, टोपी, खांद्यावरील स्टार्स, जणू काही खऱ्या अर्थाने आजचा हा छोटा ‘इन्स्पेक्टर’ आपल्या डोळ्यांसमोर उभा ठाकला होता. एवढ्या चिमुकल्याच्या या पोशाखातली शिस्त, आत्मविश्वास आणि निरागसता बघून उपस्थित शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर अनाहूत हसू फुललं.
या अनोख्या वेशभूषेचं वैशिष्ट्य एवढंच नव्हतं, तर त्यातून उमटणारा संदेश होता उद्याचा जबाबदार नागरिक, देशासाठी तत्पर प्रहरी. कदाचित अशाच क्षणांमधून मुलांच्या कोवळ्या मनात सेवा, शिस्त आणि देशभक्तीची बीजे पेरली जातात.
हा लहानसा इन्स्पेक्टर पाहून स्वतः रेवदंडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत किरवलेही भावूक झाले. त्यांनी छोट्या माहीचं जवळ जाऊन कौतुक केलं, त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि शुभेच्छा दिल्या. त्या क्षणी, मोठ्या अधिकाऱ्याच्या नजरेत लहानग्याच्या डोळ्यांत चमकणारा आनंद पाहून साऱ्यांच्याच मनात एकच भावना दाटून आली देशाच्या भविष्यासाठी हीच खरी आशा!