ग्रामसेविकेवर वारंवार अत्याचार — पंचायत समितीच्या सभापतीच्या पतीवर गुन्हा दाखल

दिनांक : १२ ऑगस्ट २०२५
छावा –रेवदंडा – सचिन मयेकर
छत्रपती संभाजीनगर – उस्मानपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ग्रामसेविकेवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पंचायत समितीच्या सभापतीच्या पतीविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेच्या नोकरीवर गदा आणण्याची धमकी, खासगी व्हिडीओ व फोटो व्हायरल करण्याचा दबाव, तसेच लग्नाचे आमिष दाखवत घटस्फोट घ्यायला भाग पाडणे, अशा धक्कादायक आरोपांचा समावेश फिर्यादीत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे नाव दीपक सुरवसे असून तो बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील खांडवी येथील रहिवासी आहे. २०१९ मध्ये त्याची पत्नी पंचायत समितीची सभापती असताना सर्व कारभार तोच पाहत होता. कामाच्या निमित्ताने आरोपीचा पीडितेशी संपर्क आला. सप्टेंबर २०२२ मध्ये संभाजीनगरातील एका हॉटेलमध्ये बोलावून त्याने पहिला अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
त्यानंतर, संभाजीनगर, इगतपुरी, नाशिक आणि अहिल्यानगरातील विविध हॉटेल्स व रिसॉर्ट्समध्ये नेऊन त्याने वारंवार अत्याचार केल्याचा आरोप आहे. आरोपीने पीडितेच्या पहिल्या पतीपासून घटस्फोट घ्यायला भाग पाडल्याचे तसेच तिच्या पतीचा खून करण्याचाही कट रचल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. २ जुलै रोजी पीडितेच्या राहत्या परिसरात गोंधळ घालून धमक्या दिल्याची नोंद आहे.
या प्रकरणी उस्मानपुरा पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.