दर्यात पुन्हा एकदा झोकून देणाऱ्या आशा…नारळीपौर्णिमेच्या शुभेच्छा.

दिनांक : ८ ऑगस्ट २०२५
लेखक : सचिन मयेकर – छावा
नारळी पौर्णिमा…
आजचा दिवस फक्त नारळ अर्पण करण्याचा नाही – तर आपल्या जिवाभावाच्या दर्याशी पुन्हा एक नवं नातं जोडण्याचा.
रात्र सरतेय. लाटांचे आवाज झोपेच्या कवेत शिरलेत. पण एका छोट्याशा घरात अजूनही दिवा उजळतोय.
कोळी नवरा-बायको बसलेत, थोड्या आशा, थोड्या चिंता आणि खूप प्रेम घेऊन…
“बघ ग, उद्यापासून आपला धंदा सुरू होईल…”
तो म्हणतो.
तिच्या डोळ्यांत थोडी शंका, पण त्याहीपेक्षा अधिक विश्वास.
“कर्ज वाढलंय, पण हिम्मत वाढलीय!
आपली होडी समुद्रात उतरेल…
बांगड्याचं सोनं आपल्याच जाळ्यात येईल.”
ती हळूच मान डोलावते.
“आसनीचं कॉलेज, छोट्यांच्या वह्या, नवा पंखा…
सगळं घेईन मी ह्यावर्षी…
आपलं स्वप्न साकार होईल ना, बघ!”
बाहेर होड्या सजतायत. झेंड्यांनी, नव्या जाळ्यांनी.
त्या फक्त लाकडाच्या नव्हे – तर स्वप्नांच्या नौका आहेत.
दर्याने आजवर किती जणांची परीक्षा घेतलीय… पण प्रेमाने सोबतही दिलीय.
आज तोच दर्या, हीच वल्ही – पण नवीन उमेद घेऊन.
कोळी बांधव समुद्राकडे पाहतात – देवासारखा. आणि देव त्यांना हर वेळेला झगडून जिंकायला शिकवतो.
मी – एक पत्रकार – पण आज या साक्षीने भारावून गेलोय.
कारण हे केवळ धंद्याचं नव्हे… तर माणसांच्या जिद्दीचं, मायेचं आणि स्वप्नांचं चित्र आहे.
आजचा लेख – आपल्या कोळी बांधवांना समर्पित