दरोडेखोरांवर आंचल दलाल यांची धडक मोहीम – सहा जेरबंद, एक फरार

छावा- सुधागड,रायगड – सचिन मयेकर- ७ ऑगस्ट २०२५
रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात दोन गावांवर सशस्त्र दरोडा टाकणाऱ्या टोळीचा पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांच्या नेतृत्वाखाली धडक मोहिमेद्वारे पर्दाफाश करण्यात आला. सहा दरोडेखोरांना अटक करण्यात आली असून एक आरोपी अद्याप फरार आहे.
२६ जुलैच्या रात्री हातोंड बौद्धवाडी आणि गोंदाव या दोन गावांमध्ये सहा-सात जणांच्या टोळक्याने थरकाप उडवणारा दरोडा टाकला होता. शस्त्रांच्या धाकाने घरातील लोकांना दहशतीत ठेवून दागिने, रोख रक्कम आणि मौल्यवान वस्तू लुटण्यात आल्या होत्या.
धडाकेबाज पोलिसी कारवाई:
गुन्हा घडल्यानंतर अवघ्या काही तासांत SP आंचल दलाल यांनी पोलिसांची 10 विशेष पथकं तात्काळ रवाना केली. गुप्त माहिती, सायबर ट्रेसिंग आणि तांत्रिक विश्लेषणाच्या जोरावर ही मोहीम राबवली गेली. काही दिवसांच्या अथक शोधानंतर सहा आरोपींना विविध ठिकाणांहून अटक करण्यात आले.
अटक आरोपी – चव्हाण टोळी:
अजय चव्हाण, आकाश चव्हाण, सुनील चव्हाण, मल्हारी चव्हाण, सोमनाथ चव्हाण, सुजल चव्हाण
या टोळीने रायगडसह अन्य जिल्ह्यांमध्येही गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. विशेष म्हणजे अजय चव्हाणवर राज्यभरात तब्बल ६ गुन्ह्यांची नोंद, तर इतर आरोपींवरही तीन ते पाच गुन्हे दाखल आहेत.
गुन्ह्यातील लुट कुठे विकली गेली, याचा माग घेतला जात असून, लवकरच तो मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात येणार असल्याची माहितीही दलाल यांनी दिली.
या प्रकरणातील एक आरोपी गावागावात टेंपोमधून भाजी विकत फिरायचा. भाजी विक्री हा केवळ मुखवटा होता. त्यादरम्यान तो कोणत्या घरात कोण राहतंय, कोणत्या महिलांकडे दागिने आहेत, हे टिपायचा – आणि त्यानंतर ठरवायचा दरोड्याचा प्लॅन!
या मोहिमेमध्ये रोहा SDPO रविंद्र दौंडकर, LCB चे PI मिलिंद खोपडे, API भास्कर जाधव, मानसिंग पाटील, PSI लिंगप्पा सरगर, शेरेकर, शिंदे, निकम, गोसावी यांच्यासह अनेक कर्मचारी सहभागी होते.
जिल्ह्यातील नागरिकांनी भीती न बाळगता आम्हाला सहकार्य करावे. कायदा आणि सुव्यवस्थेचा भंग करणाऱ्यांना गय केली जाणार नाही,
अशी ठाम प्रतिक्रिया अधीक्षक आंचल दलाल यांनी दिली.