घरकुलासाठी वाट… आणि महामार्गासाठी विस्थापन!

दिनांक : ५ ऑगस्ट २०२५
छावा – विशेष लेख – सचिन मयेकर
घर मिळेल, लवकरच मंजूरी येईल – हे आश्वासन गोरगरिबांसाठी नवीन नाही.
मोडकं घरं, गळक्या भिंती, तुटकं छप्पर – हे वास्तव झेलत अनेक कुटुंबं वर्षानुवर्षं “घरकुल” योजनेच्या प्रतीक्षेत आहेत.
पण दुसरीकडे, महामार्ग प्रकल्पासाठी काम करणाऱ्या बाहेरच्या मजुरांसाठी काही दिवसांत झपाट्याने वसाहती उभ्या राहतात – पक्क्या पत्र्याच्या निवासासह.
विरोधाभास जिथे जिवंत आहे
स्थानिक रहिवासी – अजूनही घरकुलाच्या मंजुरीची वाट पाहत आहेत.
आणि रस्त्याचं काम सुरू करणाऱ्या मजुरांना – तात्पुरतं का होईना, पण घर मिळालं!
ज्यांचं आयुष्य इथंच गेलं, त्यांना छप्पर नाही… आणि बाहेरून आलेल्यांसाठी तत्काळ निवास!
महामार्ग प्रकल्प – विकास की विस्थापन?
गावाच्या बाहेरून जाणारा महामार्ग हा जिल्ह्याच्या दृष्टीने मोठा प्रकल्प आहे.
वाहतुकीला चालना,
पर्यटनवाढ,
स्थानिक अर्थव्यवस्थेला गती…
पण याच महामार्गाच्या रेषेत आली आहेत काही गोरगरीब कुटुंबांची घरं, झोपड्या, पिढीजात वास्तव्य.
त्यांना मिळाल्या आहेत “घर मोकळं करा” नोटीसा.
“घर रिकामं करा” – पण कुठं जा म्हणायचं?
काहींना ७/१२ उतारा नाही.
काही घरं जुनी, पण तिथं पिढ्यांपासून वास्तव्य आहे.
काही कुटुंबांमध्ये गर्भवती महिला, वृद्ध, लहान बाळं आहेत.
पण कोणत्याही पर्यायी जागेविना त्यांना सांगितलं जातं – “घर सोडा!”
घरकुलासाठी संघर्ष करणाऱ्यांना काय लाभ?
अर्ज केले गेलेले आहेत…
मंजुरी आलेली, पण निधी नाही…
काहींनी स्वखर्चाने बांधलेलं अर्धवट घर,
पण आज त्या घरावरच “उधळण्याची” नोटीस!
“मजुरांसाठी तत्काळ घरं… स्थानिकांसाठी प्रतीक्षा?”
महामार्गावर काम करणाऱ्या मजुरांसाठी:
पत्र्याची घरे
वीज आणि पाणी
सुरक्षित निवास
हे सगळं काही दिवसांत उभं केलं जातं.
मग स्थानिकांच्या घरकुलासाठी वर्षानुवर्षं का?
ग्रामपंचायतींचे प्रयत्न – पण अडथळ्यांची शर्यत
ग्रामपंचायती आपल्या परीने योजनांचं पाठपुरावा करत आहेत.
मात्र:
निधी उशिरा येतो,
प्रक्रिया लांबते,
तांत्रिक नियमात अडकतात.
अणि त्यात लोकांच्या आशा अधिकच धूसर होतात.
पर्यायी जागा हक्काने मिळायला हवी
महामार्ग आवश्यक आहे.
पण विस्थापित होणाऱ्या कुटुंबांना तात्पुरतं निवास, स्थायिक पर्याय किंवा न्याय्य नुकसानभरपाई मिळणं गरजेचं आहे.
हे केवळ औपचारिक बाब नाही – तो त्यांचा अधिकार आहे.
शेवटचा सवाल…
“घर” ही केवळ भिंतींची रचना नसते –
ती वास्तवाच्या आठवणींची आणि माणुसकीच्या आधाराची जागा असते.
महामार्ग झपाट्याने होतोय,
मजुरांची वस्ती तयार होते,
पण स्थानिक गरिबाचं हक्काचं घर आजही अधुरं आहे…
हीच आजच्या विकासाची सर्वात मोठी शोकांतिका आहे का?