बाप – आयुष्याचा पहिला सावलीदार मित्र!

सचिन मयेकर | छावा मराठी विशेष लेख
दि. ०३ ऑगस्ट २०२५
मैत्री म्हणजे हसणं, रडणं, समजून घेणं… आणि न बोलता साथ देणं.
आज Friendship Day! मित्रांच्या आठवणी, फोटो, फ्रेंडशिप बँड्स, मेसेजेस… सगळीकडे एकच उत्सव!
पण आयुष्यात एक असा अदृश्य मित्र असतो, ज्याचं नाव आपण क्वचितच घेतो – आपला बाप.
लहानपणी जेव्हा आपण पहिल्यांदा पडतो, तेव्हा एक मजबूत हात आपल्याला उचलतो – तो त्याचा हात असतो.
तो काहीच बोलत नाही, पण नजरेतून सांगतो धीर धर, मी आहे तुझ्या मागे!
हा पहिला विश्वास, ही पहिली साथ – हीच खरी मैत्री असते.
बापाची मैत्री हसरी नसते, पण ती खोल असते.
तो कधी ‘बेस्ट फ्रेंड’ म्हणत नाही, पण प्रत्येक संकटात आपली ढाल बनतो.
त्याला न बोलता समजतं – आपण नाराज आहोत, हरलो आहोत, किंवा फसलो आहोत.
तेव्हा तो गप्प बसूनही आपली साथ देतो – काही वेळेला रागावून, तर काही वेळेला फक्त खांद्यावर हात ठेवून.
तो आपल्या जीवनातील एकमेव मित्र असतो जो आपल्या यशावर हसतो, पण त्याच्या अपयशावर काहीही बोलत नाही.
आपण मोठं व्हावं, यासाठी तो स्वतःची स्वप्नं बाजूला ठेवतो.
तो आपल्यासाठी खिशातला शेवटचा नोटही खर्च करतो – आणि पुन्हा हसतो.
बाप म्हणजे एक अशी सावली – जी उन्हात न सांगता पसरते.
तो आपल्याला चालायला शिकवतो, धावायला शिकवतो, आणि वेळ आल्यावर मागे राहतो…
फक्त पाहण्यासाठी – आपण आता एकटे उभं राहू शकतो का?
आज मित्रदिन आहे.
आपण आपले मित्र आठवतो, त्यांना मेसेज करतो, स्टोरी टाकतो…
पण बापासाठी? त्याला केवळ एक कॉल, एक मिठी, किंवा एक साधं वाक्य पुरेसं असतं
बाबा, तूच माझा खरा मित्र आहेस.
या वाक्यात त्याला आयुष्यभराचं समाधान मिळतं.
तो जगापुढे कधी स्वतःला मोठं दाखवत नाही,
पण आपल्या लहानशा यशात तो स्वतःचा विजय मानतो.
मैत्रीचा खरा अर्थ जर कोणाच्या वागण्यात दिसतो, तर तो बापाच्या जीवनातच!
तो रागावतो, शिस्त लावतो, पण प्रेम कधीच मागे राहत नाही.
शेवटी, जेव्हा जग आपल्या पाठीवर हात ठेवणं थांबवतं, तेव्हा एकच माणूस उरतो –
बाप – जो कधीच दूर जात नाही.
आयुष्यभर असंख्य मित्र येतील, काही विसरतील, काही आठवतील…
पण बापाची मैत्री – ती जन्मभर पुरणारी असते.