मनसेचा पनवेल मध्ये धमाका – लेडीज बारवर हल्ला! – राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर मध्यरात्री ‘नाईट रायडर’ बार फोडला

छावा मुंबई –विशेष प्रतिनिधी |३ ऑगस्ट २०२५
पनवेल | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रायगड जिल्ह्यात वाढत्या अनधिकृत डान्सबारविरोधात आक्रमक भूमिका घेतल्यानंतर, मनसे कार्यकर्त्यांनी पनवेलमधील ‘नाईट रायडर’ या लेडीज सर्व्हिस बारवर मध्यरात्री धडक कारवाई केली. हा बार पनवेलजवळील कोन परिसरात, मुंबई-पुणे द्रुतगती मार्गालगत स्थित आहे.
काठ्या-दांडक्यांसह बारवर हल्ला!
शनिवारी रात्री बारा वाजता मनसैनिकांनी बारमध्ये घुसून तोडफोड केली. घटनास्थळी असलेले ग्राहक व कर्मचारी या अचानक हल्ल्यामुळे भयभीत झाले. बारमध्ये रात्री उशिरापर्यंत सुरू असलेली ‘विनोदी’ सेवा आणि अश्लील नृत्य हेच यामागचे मुख्य कारण असल्याचे मनसे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
राज ठाकरे काय म्हणाले?
राज ठाकरे नुकतेच शेतकरी कामगार पक्षाच्या ७८व्या वर्धापन दिनानिमित्त पनवेलमध्ये आले होते. त्यांनी आपल्या भाषणात तीव्र शब्दात रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या डान्सबारवर संताप व्यक्त केला. ते म्हणाले:
आज सर्वाधिक डान्सबार रायगड जिल्ह्यात कसे? रायगड ही छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी! कल्याणच्या सुभेदाराच्या सूनबाईने खणानारळाने ओटी भरले त्या मातीत, आज अश्लीलतेचा बाजार मांडला जातो, हे खपवून घेणार नाही.
महाराष्ट्र गुजराती माणसांच्या प्रेमामुळे नव्हे तर मराठी-गुजराती यांच्यात भांडणे लावण्यासाठी विकला जातोय. डोळे उघडे ठेवा, कान बंद करू नका. पायाखालची जमीन निसटतेय, मराठी भाषा जातेय – आणि एक दिवस पश्चातापाचा हात कपाळावर मारावा लागेल,” असे त्यांनी इशारावजा विधान केले.
राज ठाकरे यांच्या वक्तव्याने आणि मनसेच्या हल्ल्यानंतर, पुन्हा एकदा महाराष्ट्रात ‘डान्सबार’च्या कायदेशीरतेवर व सामाजिक परिणामांवर चर्चा रंगू लागली आहे. रायगडसारख्या ऐतिहासिक व पवित्र भूमीवर अनैतिक व्यवसाय चालणे, हे अनेकांसाठी खटकणारे असल्याने मनसेच्या कृतीला जनतेचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे.