अलिबाग दुर्घटना | तीनही बेपत्ता मच्छिमारांचे मृतदेह आढळले; समुद्राने आणखी तिघांवर काळाचा घाला घातला

अलिबाग, २९ जुलै २०२५ (छावा प्रतिनिधी):
अलिबाग तालुक्यातील खांदेरी किल्ल्याजवळ शनिवारी (२६ जुलै) मासेमारीसाठी गेलेली ‘तुळजाई’ नावाची बोट पलटी झाल्यानंतर बेपत्ता झालेल्या तीन मच्छिमारांचे मृतदेह सोमवारी (२८ जुलै) अखेर आढळून आले. समुद्रात बेपत्ता झालेल्यांपैकी नरेश राम शेलार, धीरज कोळी (रा. कासवला पाडा) आणि मुकेश यशवंत पाटील या तिघांचे मृतदेह अनुक्रमे सासवणे, किहीम आणि दिघोडे किनाऱ्यावर सापडले.

ही घटना रायगड जिल्ह्यातील मासेमारी समुदायासाठी अत्यंत वेदनादायक ठरली आहे. तुळजाई नावाची ही बोट उरण तालुक्यातील करंजा येथून शनिवारी मासेमारीसाठी खांदेरी किल्ल्याजवळ आली होती. सकाळी साडेआठच्या सुमारास अचानक तब्बल ६० फूट उंचीची महाकाय लाट उसळली आणि बोट उलटली. बोटीवर एकूण आठ खलाशी होते. त्यातील पाचजण—हेमंत बळीराम गावंड (आवरे), संदीप तुकाराम कोळी, रोशन भगवान कोळी (करंजा), शंकर हिरा भोईर आणि कृष्णा राम भोईर (आपटा, पनवेल)—यांनी लाटांशी झुंज देत पोहत सासवणे किनाऱ्यावर जीव वाचवला.

मात्र उर्वरित तिघे समुद्रात बेपत्ता झाले होते. दोन दिवस सुरू असलेल्या तटरक्षक दलाच्या, स्थानिक पोलीस प्रशासनाच्या आणि गावकऱ्यांच्या शोध मोहिमेनंतर सोमवारी हे तिघे मृतावस्थेत सापडले. मृतदेहांची ओळख पटवून आवश्यक वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले असून, नंतर कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले.

या दुर्घटनेने संपूर्ण कोळीवाडा आणि मासेमारी समाजात शोककळा पसरली आहे. एकाच भागातील तिघे युवक अशा हृदयद्रावक पद्धतीने जाणे, हे त्यांच्या कुटुंबीयांसह साऱ्या रायगडवासीयांसाठी असह्य वेदना निर्माण करणारे ठरले आहे.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *