साळाव ते तळेखार रस्ता – खड्ड्यांचा कहर, चिखलाचा थर – प्रवास म्हणजे जीव धोक्यात!

छावा –साळाव| सचिन मयेकर |२७ जुलै २०२५
कासवाच्या गतीने सुरू असलेलं रस्त्याचं काम; अर्धवट रस्ता, वाढते अपघात, रुग्णवाहीकही अडकते – जबाबदार कोण?
साळाव ते तळेखार मार्गावरील रस्त्याचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून कासवाच्या गतीने सुरू आहे. ठेकेदाराने दोन्ही बाजूंनी रस्ता खोदून टाकला असून, आज या मार्गावरून प्रवास म्हणजे जीवावरच उठलेला आहे. खड्डे, चिखल, अपूर्ण रस्ता, धोकादायक उतार आणि पाण्याचे डबके – हे सारे अपघातांना निमंत्रण देणारे ठरत आहेत.
वाहन चालवताना अक्षरशः आकाशात उडाल्यासारखा धक्का बसतो – रस्ता कुठे संपतो आणि खड्डा कुठे सुरू होतो, हे समजेनासं झालं आहे. परिणामी या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांची दिवसरात्र कसरत सुरू आहे.
या मार्गावर साळाव येथील प्रसिद्ध बिर्ला मंदिर, त्याच परिसरातील स्टेट बँक ऑफ इंडिया, तसेच एक नामांकित इंग्लिश मीडियम स्कूल आहे.
दूरवरून येणाऱ्या विद्यार्थ्यांची वर्दळ, मंदिरामुळे पर्यटकांची सततची ये-जा आणि स्थानिक ग्रामस्थांची दैनंदिन वाहतूक – हे सारे या मार्गावर रोज चालते. अशा वेळी रस्त्याच्या कामातील ढिसाळपणा आणि अर्धवटपणा यामुळे विद्यार्थ्यांच्या, पर्यटकांच्या आणि ग्रामस्थांच्या जिवाशी सरळ खेळ होत आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे.
रुग्णवाहिका अडकते, अपघात वाढले
या रस्त्याची अवस्था इतकी खराब आहे की रुग्णवाहिकाही वेळेत रुग्णांना दवाखान्यात पोहोचवू शकत नाही. गेल्या काही दिवसांत या मार्गावर अनेक दुचाकीस्वार अपघातग्रस्त झाले आहेत. चिखलामध्ये गाड्या अडकतात, लोक घसरतात, गडगडतात. पावसाळ्यात तर परिस्थिती आणखी बिकट झाली आहे.
तयार झालेल्या भागातही अडथळे
ज्या ठिकाणी रस्ता काही प्रमाणात तयार झालेला आहे, तिथे देखील ठेकेदार कंपनीच्या गाड्या उभ्या केलेल्या आहेत. त्या हटविल्या, तरी निदान त्या मार्गाने वाहनं तरी जाऊ शकतील. पण तिथेही अडथळे निर्माण करून मार्ग बंद केल्याने नागरिकांची त्रेधातिरपीट सुरू आहे.
जवाबदारी कोणाची? – ग्रामस्थांचा संतप्त सवाल
इतक्या महत्त्वाच्या मार्गाचे काम इतके महिन्यांपासून रखडते आहे. सार्वजनिक सुरक्षिततेचा विचार न करता केवळ खोदकाम करून ते तसेच सोडणे, हा गंभीर निष्काळजीपणा आहे. ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांनी याबाबत स्पष्ट उत्तर द्यावे आणि त्वरित योग्य ती कारवाई करावी, अशी ग्रामस्थांची जोरदार मागणी आहे.
या प्रकारामुळे नागरीकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला असून, प्रशासनाने याची तात्काळ दखल घ्यावी, अशी जोरदार मागणी होत आहे.