रायगडमध्ये समुद्रात मोठी दुर्घटना – खांदेरी किल्ल्याजवळ मासेमारी बोट बुडाली, ५ जणांचा जीव वाचला, ३ जण बेपत्ता – शोध मोहीम युद्धपातळीवर सुरू

रायगड – छावा मराठी, सचिन मयेकर
रायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक खांदेरी किल्ल्याजवळ आज सकाळी मासेमारीसाठी गेलेली एक बोट समुद्रात बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण कोकण किनारपट्टीवर खळबळ उडाली आहे. बोटीत एकूण ८ मच्छीमार होते. त्यातील पाच जणांनी पोहत किनाऱ्यावर येत आपला जीव वाचवला आहे, तर उर्वरित तीन जण अद्याप बेपत्ता असून त्यांचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे.
ही बोट उरणमधील करंजा येथील मच्छीमार मनोहर गणपत कोळी यांच्या मालकीची असून ‘तुळजाई’ या नावाने परिचित आहे. आज सकाळी ७ वाजता करंजा किनाऱ्यावरून ही बोट मासेमारीसाठी बाहेर पडली होती. सुमारे साडेआठ वाजण्याच्या सुमारास ही बोट खांदेरी किल्ल्याजवळ ओहोटीच्या लाटांमुळे अचानक पलटी होऊन समुद्रात बुडाली. त्या वेळी बोटीत आठ मच्छीमार होते.
दुर्दैवाने बोट उलटताच समुद्रात जीवन-मरणाचा संघर्ष सुरू झाला. सुदैवाने पाच जणांनी पोहत जीव वाचवण्यात यश मिळवले. यामध्ये रोशन कोळी या तरुणाच्या डोक्याला जबर मार बसला असून अन्य चार जण किरकोळ जखमी झाले आहेत. सर्व जखमींना तात्काळ उपचारासाठी अलिबाग सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या दुर्घटनेत सध्या नरेश राम शेलार, धीरज कोळी (रा. कासवला पाडा, उरण) आणि मुकेश यशवंत पाटील हे तिघे मच्छीमार अद्याप बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे. ड्रोनच्या मदतीने आणि कोस्टल गार्ड, पोलीस, स्थानिक मच्छीमारांच्या सहकार्याने शोधमोहीम युद्धपातळीवर राबवली जात आहे.
समुद्रात उधाण आणि हवामान प्रतिकूल असल्याने शोधमोहीमेत अडथळे येत आहेत, परंतु प्रशासनाने कोणतीही कसर न ठेवता संपूर्ण ताकद लावली आहे.
पावसामुळे परिस्थिती बिकट झाली असून मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा जोर आहे. या मुसळधार पावसामुळे समुद्रात उधाण येऊन मासेमारी करणाऱ्या बोटींना धोका निर्माण झाला आहे, आणि त्याचा फटका ‘तुळजाई’ बोटीला बसला.
या दुर्घटनेची माहिती मिळताच तटरक्षक दल, पोलीस प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि स्थानिक मच्छीमार बांधव घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य वेगाने सुरू आहे. बेपत्ता मच्छीमारांच्या कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
छावा मराठी – सचिन मयेकर तर्फे या दुर्घटनेतील सर्वांना धीर मिळो आणि बेपत्ता नागरिक लवकर गवसावेत हीच प्रार्थना.