साई मंदिर चोरी प्रकरणातील सराईत आरोपी पेण पोलिसांच्या जाळ्यात; मंदिर भक्तांना दिलासा

छावा – रेवदंडा| सचिन मयेकर |२६ जुलै २०२५
पेण शहरातील कासार तलावाजवळील साई मंदिरातून समई व घंटा चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अखेर पेण पोलिसांनी अटक केली असून, या उत्कृष्ट कामगिरीमुळे साई भक्तांमध्ये मोठा दिलासा व्यक्त होत आहे.
या संदर्भातील गुन्हा क्रमांक 133/2025, भादंवि कलम 305(ड) नुसार पेण पोलीस ठाण्यात 21 जुलै 2025 रोजी दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा दिनांक 20 जुलै रोजी सायंकाळी 11 ते 7 या वेळेत घडला होता. आरोपीने मंदिरातून एक समई व दोन घंटा चोरल्या होत्या.
या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन टोम्पे यांच्या देखरेखीखाली गुन्हे प्रगतीकरण शाखेच्या दोन टीमद्वारे सुरू करण्यात आला. पेण शहरातील सुमारे 15 ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले गेले. त्यातून आरोपीचे फुटेज मिळाले असून, गुन्ह्यानंतर आरोपीने पेण एसटी स्टँडवरून पनवेलकडे बसने प्रवास केल्याचे निष्पन्न झाले.
तपास अधिक खोलवर गेल्यानंतर रेकॉर्डवरील सराईत आरोपी महेश नंदकुमार चायनाखवा (रा. थेरोडा आगल्याची वाडी, रेवदंडा, ता. अलिबाग) याची माहिती समोर आली. तो 21 मे 2025 रोजी अलिबाग कारागृहातून सुटलेला असून, त्या नंतर तो घरात राहत नव्हता. त्याचा फोटो मिळवून सीसीटीव्ही फुटेजशी जुळवण्यात आला असता दोन्हीमध्ये साम्य आढळून आले.
यानंतर तपास टीमने तांत्रिक माहितीच्या आधारे शोधमोहीम राबवली. दिनांक 25 जुलै रोजी आरोपी पनवेलहून पेणकडे येत असल्याचे लक्षात येताच खारपाडा चौकी येथे एसटी बसमध्ये सापळा रचून आरोपीला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून, केवळ पेण नव्हे तर वडखळ, दादर सागरी, रोहा, कोलाड या पोलीस ठाणे हद्दीतील मंदिरांमधूनही समया, घंटा यांसारख्या किरकोळ वस्तू चोरल्याची कबुली दिली आहे.
सदर आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असता 29 जुलै 2025 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस त्याच्याकडून आणखी माहिती घेत असून अन्य मंदिर चोऱ्यांचा तपासही सुरू आहे.
ही यशस्वी कारवाई पेण पोलिसांच्या पुढील अधिकाऱ्यांनी केली आहे:
सहाय्यक पोलीस निरीक्षक: निलेश राजपूत
एएसआय: राजेश पाटील
हेड कॉन्स्टेबल: सुशांत भोईर (14/24), प्रकाश कोकरे (861), अजिंक्य म्हात्रे (1568), सचिन वस्कोटी (885)
पोलीस नाईक: अमोल म्हात्रे (PN 23/19)
पोलीस कॉन्स्टेबल: गोविंद तलवारे (1951), संदीप शिंगाडे (1241)
पेण पोलिसांची ही तात्काळ आणि अचूक कामगिरी निश्चितच कौतुकास्पद आहे. या कामगिरीमुळे शहरातील मंदिर परिसरात पुन्हा भक्तांचा विश्वास वाढलेला पाहायला मिळत आहे.