तोफांचे गारूड आणि एक वीर प्राण! – निलेश तुणतुणे : कारगिलचा रणबीर

आज, २६ जुलै — कारगिल युद्धाचा २६ वा स्मृतिदिन!
ज्या रणभूमीत भारतीय शूरवीरांनी मातृभूमीसाठी प्राण अर्पण केले, त्या वीरांना “छावा – मराठी डिजिटल न्यूज नेटवर्क” व SMNEWS मराठी न्युज चॅनेल तर्फे वीरांना मानाचा सलाम!
व मानाचा मुजरा!

तोफांचे गारूड आणि एक वीर प्राण! – निलेश तुणतुणे : कारगिलचा रणबीर

लेखक – छावा – सचिन मयेकर

अलिबागच्या भूमीत, समुद्राच्या लाटांशी जणू शौर्याचं गुंजन करणारा कुलाबा किल्ला उभा आहे – एक अढळ साक्षीदार… मराठा नौदलाचे जनक कान्होजी आंग्रे यांच्या शौर्याचा. या वीर भूमीवरच एका अजोड रणवीराचा जन्म झाला – ज्याचं नाव आज ‘कारगिल’च्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरलेलं आहे – निलेश नारायण तुणतुणे.

जन्माला आला तो शौर्याच्या घुंगरांनी नटलेला मुलगा

सहानगोटी या छोट्याशा गावात, सहा फेब्रुवारी 1975 रोजी निलेश या नावाचं वादळ जन्माला आलं. लहानपणापासून डोळ्यांत अंगार, अंगात वणवा आणि मनात स्वप्नं होती मातृभूमीच्या रक्षणाची! कबड्डीच्या मैदानी झुंजीत त्याने बालपणातच रणाची चव चाखली होती.

या मातीशी नाळ जोडली ती कायमची… – सहानगोटीतील माती त्याने अंगाला लावली आणि वीरता मनात भिनवली.

पाय कुलाब्यावर, नजर हिमालयावर

प्राथमिक शिक्षण सहानगोटीमध्ये घेतल्यानंतर सहानगोटीचा हा छानुला जे.एस.एम. कॉलेज, अलिबाग मध्ये उच्च शिक्षणासाठी दाखल झाला. समुद्राच्या लाटांइतकीच धगधगत्या स्वप्नांची तडफ त्याच्या मनात होती. कॉलेजमध्ये शिकताना त्याच्या डोळ्यांत सतत एकच प्रश्न चमकत राहायचा – देशासाठी काय करू शकतो मी?

त्याने लष्कराच्या भरतीकडे वाटचाल केली – आणि एक दिवस तो बनला ‘मराठा बटालियन’चा रणसिंह’.

हैदराबाद ते हिमालय – लढाऊ प्रवासाची सुरुवात

हैदराबाद येथे प्रशिक्षण पूर्ण करून तो बनला लष्कराचा ‘गन मास्टर’ – ज्याच्या नेमबाजीला फक्त लक्ष्य दिसायचं… मृत्यू नाही! खेळाडूपण, नेतृत्वगुण, शिस्तप्रिय स्वभाव – या साऱ्याच गुणांनी तो वेगळा ठरू लागला. लवकरच लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्याच्या नेतृत्व क्षमतेची पारख झाली.

त्याला गन मास्टर म्हणून विशेष सन्मान मिळाला. नेमबाजीत प्राविण्य, युद्धकौशल्य, आणि सहकाऱ्यांशी जीवाभावाचं नातं – त्याने लष्करातही आपला मोठा मित्रपरिवार कमावला.

कारगिल – रणाची जमीन, रक्ताची साक्ष

१९९८ साल…
श्रीनगरजवळील बारा मुल्ला येथे निलेश त्याच्या तुकडीसह गस्त घालीत होता. १ ऑगस्ट रोजी अचानक सीमारेषेवर आग भडकली. पाकिस्तानने केलेल्या घुसखोरीनंतर तोफांचा आणि गोळ्यांचा मारा सुरू झाला.

पण जिथे अन्यजण मागे हटतात, तिथे निलेश पुढे जातो!
माझ्या मातीत घुसखोरी? नाही! मी आहे! – अशा निर्धाराने निलेश रणात उतरला. आपल्या बंदुकीतून अंगार उडवत त्याने अतिरेक्यांना प्रत्युत्तर दिलं. शत्रूंपुढे न झुकता तो शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहिला.

शौर्याच्या महायात्रेची अंतिम पायरी

तो दिवस… आणि ती क्षण… जेव्हा एक भारतीय जवान रणात झुंजत, रक्तबंबाळ होऊनही शेवटचा श्वास घेतो – पण ओठांवर फक्त एकच शब्द असतो – “भारत माता की जय!

निलेश तुंतुणेही असाच गेला – एक योद्धा म्हणून. एक अमर हुतात्मा म्हणून.
चित्रपटात नाही, खऱ्या आयुष्यातला हिरो!

जर निलेशवर सिनेमा काढला गेला असता, तर शेवटच्या सीनमध्ये रणभूमीत पडलेल्या निलेशचे डोळे आकाशाकडे पाहून बोलले असते –
आई, मी शब्द पाळला… तुझी माती परक्याच्या पायाखाली नाही जाऊ दिली!

सहानगोटीच्या मातीने हिरा घडवला… आणि त्याने भारतभूमीला झळाळी दिली!

आजही त्याचं नाव घेतलं की शहारे येतात… छाती अभिमानाने फुलते.
कारगिलच्या वीरगाथेत त्याचं नाव अमर आहे – शौर्य, निष्ठा आणि बलिदानाचं प्रतीक.

“शहीद जवान अमर रहें! जय हिंद!”

✦ श्रद्धांजली ✦
शहीद निलेश नारायण तुणतुणे – कारगिल युद्धातील अमर रणबीर

(हा लेख ‘कारगिल विजय दिवस’च्या निमित्ताने त्यांच्या बलिदानाला नतमस्तक होऊन सादर करण्यात आला आहे.)

 

 

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *