महाड एमआयडीसीत छापा! बंद कारखान्यातून ८८.१२ कोटींचे ड्रग्ज जप्त

महाड| प्रतिनिधी | २५ जुलै २०२५
महाड औद्योगिक वसाहतीतील एका बंद असलेल्या रासायनिक युनिटवर रायगड पोलीस आणि अंमली पदार्थ नियंत्रण विभाग (NCB) यांच्या संयुक्त पथकाने मोठी कारवाई करत ८८.१२ कोटी रुपये किमतीचे अंमली रसायन व उपकरणे जप्त केली आहेत.
मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे महाड एमआयडीसीमधील एका बंद कारखान्यावर छापा टाकण्यात आला. या ठिकाणी उत्पादन थांबले असतानाही, आतमध्ये बेकायदेशीरपणे रासायनिक प्रक्रिया सुरू असल्याचे आढळून आले. प्राथमिक तपासात हे रसायन अंमली पदार्थ तयार करण्यासाठी वापरण्यात येते, अशी माहिती समोर आली आहे.
या छाप्यात मोठ्या प्रमाणावर रासायनिक साठा, कंटेनर्स, मिश्रण साधने, प्रक्रिया यंत्रणा आणि इतर उपकरणे पोलिसांनी ताब्यात घेतली. घटनास्थळी काही व्यक्ती उपस्थित होत्या, त्यांची चौकशी सुरू असून त्यांचा या प्रकाराशी संबंधित असण्याचा संशय तपासला जात आहे.
याप्रकरणी १९८५ च्या अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार (NDPS Act) गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपास रायगड पोलीस व NCB विभाग एकत्रितपणे करत आहेत. जप्त करण्यात आलेल्या रसायनांचे नमुने फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
महाड औद्योगिक वसाहतीतील या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. बंद औद्योगिक यंत्रणांचा वापर अंमली पदार्थांच्या साखळीमध्ये होतोय का? याचा शोध लावण्यासाठी पोलीस सखोल तपास करत आहेत.
ही कारवाई महाडमधील अंमली पदार्थ विरोधी मोहिमेतील आतापर्यंतची सर्वात मोठी यशस्वी कारवाई ठरली आहे.