गुन्हा दाखल – बेकायदा सावकारी प्रकरणावर पोलिसांचा दणका; दोन सावकारांविरोधात गुन्हा

आचल दलाल यांची ‘लेडी सिंघम’ शैलीतील धडक कारवाई!

पेण | प्रतिनिधी | २३ जुलै २०२५

पेण तालुक्यात अटी-शर्तींचा भंग करून कार्यक्षेत्राबाहेर सावकारी व्यवसाय करणाऱ्या आणि व्याजाच्या नावाखाली नागरिकांची अक्षरशः लूट करणाऱ्या दोन सावकारांविरोधात रायगड पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.त्याच्यावर गुन्हा दाखल कारण्यात आला आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या थेट आदेशानंतर करण्यात आली असून, त्यांची ही धडक कारवाई आता ‘लेडी सिंघम’ शैलीतील असल्याचं सर्वत्र बोललं जात आहे.

चिंचपाडा येथील सुर्यकांत पाटील व भरत पाटील हे दोघे २०२२-२३ पासून अधिकृतपणे पेण परिसरात सावकारी व्यवसाय करत होते. मात्र त्यांनी परवान्याच्या अटींचा भंग करत कार्यक्षेत्राबाहेरही बेकायदेशीरपणे दामदुपटीने व्याज घेत नागरिकांची पिळवणूक केली. याबाबत काही पीडित तरुणांनी रायगड पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्यांनी आर्थिक अडचणीत असताना घेतलेल्या रकमेवर अमानुष व्याज वसूल करून धमक्या दिल्याची सविस्तर तक्रार पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्याकडे थेट करण्यात आली होती.

दलाल यांनी ही बाब अत्यंत गांभीर्याने घेतली आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला तातडीने तपास व कारवाईचे आदेश दिले. १९ जुलै रोजी, एलसीबी (LCB) आणि सहाय्यक निबंधक संस्था पेण यांच्या संयुक्त पथकाने कारवाई करत पाटील यांच्या घर, हॉटेल आणि कार्यालयावर छापा टाकला. या छाप्यात कोरे चेक्स, स्टॅम्प पेपर्स, सावकारी पावत्यांची पुस्तके, प्रॉमिसरी नोट्स, वचनचिठ्ठ्या, मालमत्तांचे कागदपत्रे, बँक पासबुक्स, खरेदीखत, गाव नकाशा अशा असंख्य आर्थिक व्यवहारांशी संबंधित महत्त्वाचे पुरावे हस्तगत करण्यात आले.

तपासात उघडकीस आले की, सुर्यकांत आणि भरत पाटील यांनी नियम डावलून विविध गावांमध्ये बेकायदेशीर सावकारी व्यवहार करत अनेक कुटुंबांना जमीन, घरे, दागिने गमवायला लावले. व्याजाच्या नावाखाली धमकी, आर्थिक लूट आणि मानसिक छळ यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले होते.

संपूर्ण प्रकरणाचा तपास पेण पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. दरम्यान, या धाडसी आणि नागरिकहिताची कारवाई केल्याबद्दल पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांचं राज्यभरातून कौतुक होत आहे. रायगड जिल्ह्यातील जनतेसाठी न्याय मिळवून देणारी ही “लेडी सिंघम” पुन्हा एकदा चर्चेत आलीआहेत.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *