गटारी अमावस्या: एक सांस्कृतिक आणि शास्त्रीय दर्शन

‘छावा’ संपादकीय | दि. २४ जुलै | सचिन मयेकर
श्रावण सुरु होण्याआधीचा सर्वांच्या लक्षात असणारा एक विशेष दिवस म्हणजे गटारी अमावस्या. अनेक ठिकाणी या अमावस्येला दर्श अमावस्या किंवा सोमवती अमावस्या असेही म्हणतात. सर्वसामान्यांच्या मनात या दिवसाची ओळख म्हणजे मज्जा-मस्ती, गोंधळ, मित्रांसोबत पार्टी आणि भरपेट मांसाहार असा असतो. मात्र या दिवसामागील मूळ अर्थ आणि परंपरा बऱ्याचदा विसरली गेली आहे.
खरंतर ‘गटारी’ अमावस्या असा जो अपभ्रंश प्रचलित झाला आहे, त्याचा गटार किंवा गटारात झिंगून पडणे याच्याशी काहीही संबंध नाही. मूळ नाव आहे – “गतहारी अमावस्या”.
गटारी’ नव्हे, ‘गतहारी’ अमावस्या
गतहारी’ हा शब्द दोन शब्दांपासून तयार झाला आहे – गत + आहार. यामध्ये ‘गत’ म्हणजे गेला, त्यागलेला, आणि ‘आहार’ म्हणजे जेवण वा अन्न. याचा अर्थ असा की या दिवशी आपण जे आहार पुढे त्यागणार आहोत, त्याचा शेवटचा दिवस. म्हणजेच, श्रावण महिन्यात जे जे वर्ज्य करणार आहोत, त्याचा निरोप घेण्याचा दिवस म्हणजे गतहारी अमावस्या.
कालांतराने ‘गतहारी’चा अपभ्रंश होऊन ‘गटारी’ असा उच्चार होऊ लागला, आणि त्यातच आजच्या काळात मांसाहार, मद्यपान, पार्टी यांची भर पडली.
का साजरी केली जाते गतहारी अमावस्या?
हिंदू धर्मात श्रावण महिना हा विशेष पवित्र मानला जातो. या महिन्यात व्रत-वैकल्ये, उपासना, उपवास, आणि सात्त्विक जीवनशैली अंगीकारली जाते. त्यामुळेच मांसाहार, मद्यपान, तामसी आहार यांचा त्याग केला जातो. त्या त्यागाला सुरुवात करण्याआधीचा शेवटचा दिवस म्हणजे ही गतहारी अमावस्या.
हा दिवस म्हणजे शारीरिक व मानसिक शुद्धीची तयारी. जे काही आपण पुढील महिन्यात वर्ज्य करणार आहोत, ते एक दिवस ‘शेवटचा’ म्हणून घेतलं जातं. यामागे शारीरिक आणि धार्मिक दोन्ही प्रकारची शिस्त लपलेली आहे.
श्रावणात मांसाहार का वर्ज्य असतो?
हे केवळ धार्मिक कारण नसून शास्त्रीय आधार असलेले निर्णय आहेत. श्रावण महिन्यात पावसाळा जोरात सुरू असतो. यामध्ये हवामान ढगाळ, दमट आणि थोडं उग्र असतं. आपली पचनशक्ती ह्या काळात कमकुवत झालेली असते. त्यामुळे पचायला जड पदार्थ, विशेषतः मांसाहार, आपल्यासाठी त्रासदायक ठरू शकतो.
त्यातच पावसामुळे जलप्रदूषण वाढतं, मासळी सहज सडते, त्यातून विषबाधा होण्याचा धोका असतो. याशिवाय, या काळात धार्मिक साधना व व्रतांचा काळ असल्याने, आपल्या मनःशांतीसाठी सात्विकता राखणे आवश्यक असते. त्यामुळेच मांसाहार, मद्यपान, लसूण-कांदा यांचा त्याग श्रावणात केला जातो.
दीप अमावस्या: दीपपूजनाचे महत्त्व
गतहारी अमावस्या या दिवशी दीप पूजनालाही विशेष महत्त्व आहे. त्यामुळे या अमावस्येला “दीप अमावस्या” असेही म्हटले जाते.
यावेळी घरातील सर्व दिवे, समया, तांब्या, कंदील स्वच्छ करून त्यांची पूजा केली जाते. पुढील काळात भाद्रपद, अश्विन, कार्तिक यांसारखे अनेक व्रत, उत्सव, पूजा येणार असतात. त्यासाठी आधीच प्रकाशाच्या प्रतीकांची शुद्धता राखणे आणि त्यांना प्रतिष्ठा देणे आवश्यक असते.
दिव्यांचा प्रकाश म्हणजे ज्ञान, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा. त्यामुळे या दिवशी केलेल्या दीपपूजनाने आपल्या जीवनातील अज्ञानरूपी अंधःकार दूर होतो, असा धार्मिक भाव आहे.
आजच्या काळात ‘गटारी’ हा शब्द केवळ ‘धिंगाणा आणि मस्ती’ याच अर्थाने वापरला जातो. पण यामागची खरी संकल्पना शुद्ध आचार, संयम, शारीरिक आणि मानसिक स्वच्छतेची तयारी ही आहे. गतहारी अमावस्या म्हणजे केवळ जेवणाचा बदल नव्हे, तर मनाच्या तयारीचाही एक भाग आहे.
त्यामुळे ही परंपरा जपत असताना तीचा गाभा समजून घेणे आणि पुढील पवित्र श्रावण महिन्यासाठी योग्य तयारी करणे हेच खरे या दिवसाचे महत्त्व आहे.