मराठी तरुणीला मारहाण करणारा गोकुळ झा ‘सराईत गुन्हेगार

चार दिवसांपूर्वीच सुटला होता जेलमधून – आता अटकेत!
छावा दि. २३ जुलै- मुंबई (प्रतिनिधी)
कल्याणमधील खाजगी रुग्णालयात रिसेप्शनिस्ट मराठी तरुणीला मारहाण केल्याच्या धक्कादायक घटनेने संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. या हल्लेखोराची माहिती समोर येताच नागरिकांचा रोष आणखी वाढला आहे. मारहाण करणारा गोकुळ झा हा ‘सराईत गुन्हेगार’ असून, तो केवळ चार दिवसांपूर्वीच जेलमधून जामिनावर सुटून बाहेर आला होता.
मारहाण करणारा आरोपी गोकुळ झा – गुन्हेगारी पार्श्वभूमी:
गोकुळ झा याच्यावर याआधी दोन गंभीर गुन्हे दाखल आहेत.
एक गुन्हा हत्यार बाळगणे, तर दुसरा मारहाणीचा आहे.
हे गुन्हे विठ्ठलवाडी व कोळसेवाडी पोलीस ठाण्यांमध्ये नोंदवले गेले आहेत.
एका प्रकरणात त्याने हत्याराने मारहाण, तर दुसऱ्यात ट्रक चालकाला जबर मारहाण केल्याचा गुन्हा आहे.
याच प्रकरणांमुळे त्याला अटक झाली होती. तो चार दिवसांपूर्वीच जामिनावर सुटून बाहेर आला होता.
मारहाण झालेल्या तरुणीची प्रकृती गंभीर:
पीडित तरुणीच्या मानेवर जोरदार लाथ मारण्यात आली असून, त्यामुळे पॅरालिसीस होण्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.
मानेला क्रश इंज्युरी किंवा फ्रॅक्चर असल्यास हात-पाय निकामी होण्याचा धोका आहे.
तिच्या छातीत, पाठीवर व पायांवर मारहाणीचे वळ स्पष्टपणे दिसत आहेत.
सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत.
राजकीय प्रतिक्रिया व भेटी
मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी रुग्णालयात पीडित तरुणीची भेट घेतली.
त्यांनी तिच्या प्रकृतीची विचारपूस करत, “हा प्रकार सहन केला जाणार नाही. दोषींना शोधून काढल्याशिवाय आणि कठोर शिक्षा दिल्याशिवाय आम्ही थांबणार नाही,” असं ठाम आश्वासन दिलं.
पोलिसांचा तपास आणि अटकेनंतर पुढील कारवाई
या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फरार झालेल्या गोकुळ झा याला आज अखेर अटक करण्यात आली असून, त्याच्यावर कसून चौकशी सुरू आहे.
आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी, त्याचे कनेक्शन, तसेच इतर संभाव्य सहआरोपी यांचीही माहिती घेतली जात आहे.
न्यायालयात उद्दाम आणि असभ्य वर्तन करत आरोपीने गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला.
परप्रांतीय आरोपी गोकुळ झा याला कल्याण न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. यावेळी त्याने न्यायालयात गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला.गोकुळ झाचा कोर्टात गोंधळ
सुनावणीच्या वेळी गोकुळ झा याने माझ्यावर झालेली कारवाई चुकीची असल्याचा आरोप केला. माझ्या भावाला का ताब्यात घेतले? असे विचारत त्याने न्यायालयात गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी न्यायाधीशांनी कायदेशीर प्रक्रियेत अडथळा आणण्याबाबत गुन्हा दाखल करण्याची तंबी दिल्यावर तो शांत झाला. यावेळी पोलिसांनी त्याची पोलिस कोठडीत रवानगी केली.गोकुळ झा आणि त्याचा भाऊ रणजीत या दोघांनाही आज, बुधवारी दुपारी मानपाडा पोलिसांद्वारे कल्याण न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून न्यायालयामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
शिवसेनेची पोलिसांना मागणी
दरम्यान, मराठी तरुणीला मारहाण केल्याप्रकरणी शिवसेनेचे दोन्ही गट मानपाडा पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाले. पोलिसांची भेट घेण्याआधी दोन्ही पक्षातील पदाधिकाऱ्यांनी एकमेकांशी संवाद साधला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार राजेश मोरे यांनी मानपाडा पोलिसांची भेट घेतली. आरोपीला आमच्या ताब्यात देण्याची मागणी केली. महाराष्ट्रामध्ये मराठी तरुण-तरुणींना मारहाण होत असेल, तर खपवून घेतले जाणार नाही, असे म्हणत मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आरोपीला पकडून दिल्याबद्दल मोरेंनी त्यांचे आभारही मानले.