वीर चंद्रशेखर आझाद : स्वातंत्र्याची शपथ घेणारा “आझाद” क्रांतिकारक!

छावा, संपादकीय | दि. २३ जुलै (सचिन मयेकर)
भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाची कहाणी ही फक्त राजकीय वाटाघाटी, सभासद मंडळं आणि शांततेच्या आंदोलनांची नाही, तर ती आहे क्रांतीची, त्यागाची आणि रक्ताच्या थेंबातून लिहिलेल्या स्वातंत्र्याच्या ओळींची. या संघर्षामध्ये अनेक शूरवीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यापैकी एक झुंजार, निर्भय आणि तेजस्वी योद्धा म्हणजे चंद्रशेखर आझाद.
२३ जुलै १९०६ रोजी झाशी (उत्तर प्रदेश) येथे जन्मलेले चंद्रशेखर यांचे मूळ गाव होते मध्य प्रदेशातील भावरा. त्यांच्या वडिलांचे नाव सिताराम तिवारी आणि आईचे नाव जगरानी देवी होते. लहानपणापासूनच चंद्रशेखर यांच्यामध्ये जिज्ञासा, आत्मगौरव आणि देशप्रेम ठासून भरलेले होते.
वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी त्यांनी गांधीजींच्या असहकार आंदोलनात सहभाग घेतला. त्यासाठी त्यांना अटकही झाली. न्यायालयात न्यायाधीशांनी त्यांचे नाव, वय व वडिलांचे नाव विचारले असता त्यांनी निर्भयपणे उत्तर दिले
नाव – आझाद,वडिलांचे नाव – स्वातंत्र्य,घर – जेल!
याच क्षणी आझाद हे नाव भारतीय जनतेच्या मनात अढळ ठरले!
गांधीजींनी असहकार आंदोलन मागे घेतल्यानंतर चंद्रशेखर यांना शांततामार्गाचा परिणामकारकतेवर विश्वास राहिला नाही. त्यांनी क्रांतिकारक मार्ग स्वीकारला आणि हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन (HSRA) या संघटनेत सामील झाले.
तेथून सुरू झाला एका झुंजार क्रांतीकारकाचा प्रवास. त्यांनी भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, बटुकेश्वर दत्त आदींसह अनेक धाडसी मोहिमा राबवल्या. त्यांच्या काही प्रमुख कारवायांमध्ये येतात:
काकोरी रेल्वे लूट (१९२५) – ब्रिटिशांचा खजिना लुटून त्याचाच वापर ब्रिटिशांविरुद्ध करणे.
सॉन्डर्स वध प्रकरण (१९२८) – लाला लाजपत राय यांच्या मृत्यूचा बदला.
केंद्रीय विधानसभेवर बॉम्ब हल्ला (१९२९) – जनजागृतीसाठी प्रतीकात्मक स्फोट.
या सर्व कारवायांमागे योजना आखणे, प्रशिक्षण देणे, आणि अचूक अंमलबजावणी करणे हे सर्व चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वातच घडत होते.
२७ फेब्रुवारी १९३१ रोजी इलाहाबाद येथील अल्फ्रेड पार्कमध्ये पोलिसांनी चंद्रशेखर आझादला घेरले. त्यांच्याजवळ केवळ एक पिस्तूल आणि काही गोळ्या होत्या. तुफान गोळीबार होऊनही आझाद शर्थीने लढले. मात्र शेवटी एकाच गोळी शिल्लक राहिली. त्यांनी ती गोळी स्वतःवर झाडून जिवंत पकडला जाणार नाही या शपथेचा मान राखला.
आज तो उद्यान त्यांच्या नावाने चंद्रशेखर आझाद पार्क म्हणून ओळखला जातो.
चंद्रशेखर आझाद हे नाव आजही साहस, निर्भयता आणि देशप्रेम याचं मूर्तिमंत प्रतीक आहे. शाळा, महाविद्यालयं, रस्ते, उद्याने आणि अनेक संस्थांना त्यांचं नाव दिलं गेले आहे. त्यांच्या जीवनावर आधारित नाटकं, चित्रपट, लेख, आणि कविता आजही लाखोंना प्रेरणा देतात.
चंद्रशेखर आझाद यांनी आपल्या तरुण वयात स्वतःचा देह मातृभूमीस अर्पण केला. त्यांनी केवळ स्वतः झुंज दिली नाही, तर इतर तरुणांनाही प्रेरणा दिली की स्वातंत्र्य कोणाच्या भीक म्हणून नव्हे, तर संघर्षातून मिळवायचं असतं!
आजही जेव्हा कुणी तरुण देशासाठी काही तरी करायचंय!असं म्हणतो, तेव्हा त्याच्या विचारांमध्ये कुठे ना कुठे चंद्रशेखर आझाद यांचा ठसा उमटलेला असतो.
त्यांनी जन्म घेतला ‘आझाद’ म्हणून
आणि मरण पत्करलं ‘आझादी’साठी!”