मराठी तरुणीला नराधम परप्रांतीय नशेखोर तरुणाकडून बेदम मारहाण

छावा दि. २३ जुलै- मुंबई (सचिन मयेकर)
संतापजनक व्हिडिओ समोर | मनसेचा आक्रमक पवित्रा, पोलिसांकडून नराधम आरोपीला अटक
कल्याणमधील नांदिवली परिसरात एका खासगी रुग्णालयात काम करणाऱ्या मराठी तरुणीला परप्रांतीय नशेखोर तरुणाने बेदम मारहाण करत तिचा विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या अमानुष घटनेचा संपूर्ण व्हिडिओ सिसीटीव्हीत कैद झाला असून संपूर्ण परिसरात प्रचंड संतापाचे वातावरण आहे.
नेमकं काय घडलं?
२१ जुलै रोजी सायंकाळी साडेसहा वाजता ‘श्री बाल चिकित्सालय’ या रुग्णालयात ही धक्कादायक घटना घडली. सोनाली प्रदीप कळासारे, ही तरुणी रिसेप्शनिस्ट म्हणून आपले कर्तव्य बजावत होती. डॉक्टरांच्या केबिनमध्ये एमआर बसले होते, त्यामुळे सोनालीने काही पेशंटना तुम्ही जरा थांबा असे नम्रतेने सांगितले.
पण त्याच क्षणी नशेच्या अवस्थेत असलेला एक परप्रांतीय तरुण रागाने उठला. गोपाल झा असे त्या आरोपीचे नाव असून, त्याने सोनालीच्या पोटात जोरदार लाथ मारली. तिला टेबलावर आपटले आणि त्यानंतर तिचे केस ओढून फरपटत नेले. इतकेच नव्हे, तर तिचा विनयभंग करत कपडे फाडण्याचा प्रयत्न केल्याचे व्हिडिओत स्पष्टपणे दिसते.
या घटनेनंतर सोनालीला गंभीर दुखापत झाली असून, ती शारीरिक आणि मानसिक धक्क्याखाली आहे
व्हिडिओ व्हायरल, संतापाचा विस्फोट
ही घटना समोर आल्यानंतर सोशल मीडियावर व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. संपूर्ण महाराष्ट्रातून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या. मराठी मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
पोलिसांत गुन्हा दाखल, आरोपीस अटक
या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनसेसह स्थानिकांनी पोलिसांवर दबाव आणल्यानंतर अखेर २२ जुलै रोजी रात्री आरोपी गोपाल झा याला अटक करण्यात आली आहे.
मनसेचा आक्रमक पवित्रा चार तासांत अटक करा अन्यथा.
मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी रुग्णालयात जाऊन सोनालीची भेट घेतली आणि तिच्या उपचाराचा सर्व खर्च मनसेकडून उचलण्यात येईल, असे जाहीर केले
यावेळी पत्रकारांशी बोलताना जाधव म्हणाले,मराठी माणसावर अन्याय झाला की आम्ही उभं राहतो,
त्यांनी पोलिसांना चार तासांचा अल्टिमेटम दिला आणि जर त्या आत अटक झाली नाही, तर मनसे स्टाईल मध्ये कारवाई करण्याचा इशाराही दिला होता.
अटकेनंतर मनसेचा प्रतिसाद
अखेर आरोपीला अटक झाल्यानंतर मनसेने याचे स्वागत केले असून, पोलिसांचे आभार मानले आहेत. मात्र, यासोबतच त्यांनी इशारा दिला आहे की,ही शेवटची घटना ठरली पाहिजे. मराठी भगिनींच्या सुरक्षिततेसाठी यापुढे जराही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही.
महिला सुरक्षेचा गंभीर प्रश्न
ही घटना केवळ एका रुग्णालयातील नाही, तर संपूर्ण राज्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न किती गंभीर आहे, हे दर्शवणारी आहे. एक सामान्य वाक्य — तुम्ही जरा थांबा — यामुळे इतका अमानुष हल्ला होतो, हे अत्यंत लज्जास्पद आणि भयावह आहे.
मागणी : आरोपीला कठोर शिक्षा मिळालीच पाहिजे
या प्रकरणात महिलाविरोधी गुन्ह्यांचे कलम लावून आरोपीला द्रुतगती न्यायप्रविष्ट मार्गाने कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी जोरदार मागणी नागरिक आणि विविध सामाजिक संघटनांकडून करण्यात येत आहे.
मराठी मुलीचं सन्मानासाठी मनसे मैदानात – अशी प्रतिमा या घटनेनंतर निर्माण झाली आहे. मात्र, केवळ प्रतिक्रिया नाही, तर शासनाच्या पातळीवरून ठोस कृती अपेक्षित आहे.