निजामपूरचं नवं नाव – आता रायगडवाडी

छावा दि. १९ जुलै रेवदंडा (सचिन मयेकर)
रायगड जिल्ह्यातील छत्रा–निजामपूर ग्रामपंचायतीच्या नावात बदल करत आता रायगडवाडी हे नाव देण्यात आलं आहे. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी याची अधिकृत घोषणा विधानसभेत केली. ही फक्त एक नावबदलाची कारवाई नसून — इतिहास, अस्मिता, आणि स्वाभिमानाशी जोडलेली एक वैचारिक जाणीव आहे.
छत्रपति शिवाजी महाराजांनी जिथे हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली, तो रायगड — महाराष्ट्राच्या आणि भारताच्या अभिमानाचं शिखर. अशा गडाच्या पायथ्याशी वसलेलं गाव जर निजामपूर या नावाने ओळखलं जात असेल, तर त्यामागचं विरोधाभास कोणाच्या डोळ्यात भरणार नाही?
निजाम ही संज्ञा आपल्या स्वराज्यविचाराला, वीरतेला आणि इतिहासातील संघर्षांना उलट करणारी — परकीय सत्तेची आठवण करणारी. हे लक्षात घेऊनच नामांतराची मागणी झाली होती.
ही मागणी प्रथम आमदार गोपीचंद पडळकर आणि राहुल कुल यांनी लावून धरली होती. त्यांच्या म्हणण्यानुसार, “रायगडच्या पायथ्याशी असलेल्या गावाचं नाव जर निजामपूर असेल, तर ती आपली लाज आहे. याऐवजी रायगडवाडी हे नाव इतिहासाशी सुसंगत, आत्मभान जागवणारं आहे.त्यांच्या मागणीनंतर ग्रामविकास मंत्रालयाने त्याचा गांभीर्याने विचार केला आणि शेवटी १८ जुलै रोजी विधिमंडळात याची अधिकृत घोषणा करण्यात आली.
गावाचं नाव बदलणं म्हणजे केवळ शासकीय रेकॉर्डमध्ये एक नवीन नोंद एवढंच नव्हे. ते गावातील प्रत्येक व्यक्तीच्या ओळखीचा, त्यांच्या मुळाशी असलेल्या इतिहासाचा, आणि भविष्यात होणाऱ्या सामाजिक-राजकीय दिशादर्शनाचा भाग ठरतो. रायगडवाडी हे नाव आता फक्त त्या गावाचं नव्हे, तर संपूर्ण रायगड जिल्ह्याच्या सांस्कृतिक वैभवाचं प्रतीक ठरणार आहे.
या नावबदलामागे काही जण राजकीय हेतू शोधतील, काहीजण त्यात प्रादेशिकतेचा झुकाव पाहतील. पण या सगळ्याच्या पलीकडे एक गोष्ट निश्चित आहे — भारतात गावांचं, शहरांचं नावबदल हे वेळोवेळी लोकभावनांना अनुसरूनच होत आले आहेत. तेव्हा हे बदल म्हणजे इतिहासाशी आपली सांगड पुन्हा घट्ट करणेच आहे.
गावाचं नविन नाव हे त्या परिसराला नवीन ओळख देतं. भविष्यात पर्यटनाच्या दृष्टीने रायगडवाडी हे नाव अधिक प्रभावी ठरेल. गावकऱ्यांच्या अस्मितेला बळ मिळेल, युवा पिढीत इतिहासाविषयी अभिमान निर्माण होईल.
गावाची ओळख म्हणजे फक्त पत्ता नव्हे. ती एक भावना असते — भूतकाळाची साक्ष, वर्तमानाची जबाबदारी आणि भविष्याची दिशा दाखवणारा दीपस्तंभ. रायगडवाडी हे नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडावरून आपल्या मुळांची पुनःप्राप्तीच आहे.
जिथे “निजामपूर”चा इतिहास संपतो, तिथून “रायगडवाडी”चा अभिमान सुरू होतो.