एसटी बस की मृत्यूची सवारी? — बाजारपेठांत धावणाऱ्या एसटींची बेजबाबदार स्पर्धा

छावा, संपादकीय | दि. १९ जुलै(सचिन मयेकर)
१८ जुलै रोजी रेवदंडा येथील गोळा स्टॉपजवळ एक हृदयद्रावक घटना घडली. ७७ वर्षीय मथुरा वरसोलकर या वयोवृद्ध महिला एसटी बसच्या धडकेत मृत्युमुखी पडल्या. त्या आपल्या डोळ्याच्या तपासणीवरून घरी परत येत होत्या. रस्त्याने पायी चालत असताना पाठीमागून आलेल्या एसटी बसने जोराची धडक दिली, आणि क्षणात साऱ्या आयुष्याचा अंत झाला.
अशा घटना वारंवार का घडतात?
बाजारपेठांतील गर्दीच्या रस्त्यांवर एसटी बसचा भरधाव वेग, आणि अनेकदा चालकांचा मोबाईल वापर करतानाचा निष्काळजीपणा — ही काही ग्रामस्थांनी व्यक्त केलेली निरीक्षणं आहेत. काहींना वाटते की चालकांच्या एका हातात मोबाईल आणि दुसऱ्या हातात स्टिअरिंग असतं — ही एक शंका नाही, तर भीतीची जाणीव आहे.अशाप्रकारचे फ़ोटोज सुद्धा प्राप्त झालेले आहेत.
पण यामागे फक्त चालकच जबाबदार आहेत का?
हे पाहणं गरजेचं आहे की एसटी चालकांवर प्रचंड वेळेचं दडपण असतं. बस वेळेवर पोहोचवायची, विविध स्थानकांवर थांबायचं, आणि रोज हजारो प्रवाशांना सुरक्षित ने-आण करायचं — ही एक खूप मोठी जबाबदारी आहे. त्यात अपुरा कर्मचारी वर्ग, खराब रस्ते आणि तांत्रिक अडचणी यांचा सुद्धा त्यांना सामना करावा लागतो.
यामध्ये उपाय काय?
बाजारपेठांतील विशिष्ट वेळेत मोठ्या वाहनांच्या प्रवेशावर निर्बंध असावेत.
वेगमर्यादा पाळली जात आहे का, यावर तंत्रज्ञानाद्वारे (GPS, CCTV) लक्ष ठेवावे.
चालकांना वेळेचं व्यवस्थित नियोजन मिळावं, जेणेकरून ते हतबल होऊन भरधाव गाडी चालवू नयेत.
ग्रामस्थ, पोलीस, आणि एसटी विभाग यांच्यात समन्वय साधून ‘सुरक्षित बाजार रस्ता’ उपक्रम राबवावा.
हा लेख कुणावर दोषारोप करण्यासाठी नाही, तर आपण सर्वांनी मिळून अपघातमुक्त समाज कसा घडवू शकतो याचा विचार करण्यासाठी आहे. कारण अपघात ही नुसती बातमी नसते — ती कोणाच्यातरी घराचा अंधार बनते
या लेखाचा उद्देश कोणत्याही व्यक्ती, संस्था वा संघटनेला दुखावणे किंवा चुकीच्या हेतूने लक्ष्य करणे हा नाही. वरील मांडणी ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया, निरीक्षणे आणि अपघातप्रवण ठिकाणांवरील सुरक्षा चिंतेच्या अनुषंगाने केली गेली आहे. आपण सर्वांनी मिळून सुरक्षित वाहतुकीकडे पाऊल टाकावे हाच खरा हेतू…