गोळा स्टॉपजवळ एसटी बसची धडक वृद्ध पादचारी महिलेचा मृत्यू; चालकावर गुन्हा दाखल

छावा दि. १९ जुलै रेवदंडा (सचिन मयेकर)
गोळा स्टॉपजवळ गुरुवारी (दि. १८ जुलै) एक दुर्दैवी अपघात घडला. बोर्ली गावातील मधला पाडा येथील ७७ वर्षीय मथुरा रामचंद्र वरसोलकर या रस्त्याने पायी जात असताना, पाठीमागून आलेल्या एसटी बसने त्यांना जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत त्यांच्या डोक्यावरून चाक गेल्यामुळे त्या घटनास्थळीच मृत्युमुखी पडल्या.
मथुरा वरसोलकर या रेवदंडा येथे डोळ्याच्या तपासणीसाठी गेल्या होत्या. तपासणी करून त्या घरी परत येत असताना रिक्षा स्टँडच्या दिशेने चालत असताना, गोळा स्टॉपजवळ त्या एसटी बसच्या संपर्कात आल्या.
अपघातग्रस्त बस ही एमएच-२० बीएल-३९३३ क्रमांकाची स्वारगेट–मुरुड मार्गावरील एसटी बस होती. सदर बस चालकाने भरधाव व निष्काळजीपणे गाडी चालवल्याने हा अपघात घडल्याचे सांगण्यात येते.
या प्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ८२/२०२५ नुसार बसचालकाविरुद्ध भारतीय दंड विधानातील BNS कलम १०६(१), २८१, १२५(अ), १२५(ब) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे, अशी माहिती रेवदंडा पोलीस ठाण्याकडून देण्यात आली.