शुभ आगमनानंतर आंतराळवीराची कुटुंबीयांशी भावनिक भेट

छावा – वॉशिंग्टन, अमेरिका दि.१६ जुलै
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील (ISS) यशस्वी 18 दिवसांच्या मोहिमेनंतर भारतीय अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुरक्षित परतले आहेत. त्यांचे आगमन अमेरिकेत झाल्यानंतर, त्यांची पत्नी कामना आणि चार वर्षांचा मुलगा त्यांची भेट घेण्यासाठी उपस्थित होते.
या भावनिक भेटीचे काही हृदयस्पर्शी क्षण कॅमेर्यात टिपले गेले असून, सध्या हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत आहेत. एका फोटोत शुक्ला यांचा लहान मुलगा त्यांच्या कुशीत झोपलेला दिसतोय, तर दुसऱ्या फोटोत पत्नी कामनाच्या डोळ्यांत अश्रू
आणि चेहऱ्यावर समाधानाचे भाव स्पष्ट दिसतात.ही भेट केवळ एका कुटुंबासाठीच नव्हे, तर संपूर्ण देशासाठी अभिमानास्पद आणि प्रेरणादायी ठरली आहे. शुक्ला यांची ही मोहीम भारतीय अंतराळ क्षेत्रासाठी एक महत्त्वाचा टप्पा असून, आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या सहभागाची ठळक नोंद घेतली गेली आहे.शुभांशू शुक्ला यांच्या या यशस्वी मोहिमेबद्दल देशभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सोशल मीडियावर “Welcome Back Hero” आणि “Proud of Shukla” हे हॅशटॅग ट्रेंड होत आहेत.