कोर्लई समुद्रकिनारी ब्राऊन बुबी पक्षी आढळला

छावा  रेवदंडा  ता.७ (सचिन मयेकर)

मुरुड तालुक्यातील कोर्लई समुद्रकिनारी ब्राऊन बुबी (Sula leucogaster) हा दुर्मिळ समुद्री पक्षी आढळून आला आहे. सकाळच्या सुमारास ग्रामस्थ नितेश पाटील यांना हा पक्षी थकलेल्या अवस्थेत समुद्रकिनारी बसलेला दिसला. त्यांनी तत्काळ अलिबागच्या कांदळवन वनविभागाचे वनरक्षक अनिल बोडखे यांच्याशी संपर्क साधला.

वनरक्षक बोडखे यांनी त्वरित घटनास्थळी येऊन सदर पक्षाची पाहणी केली व अधिकृत पंचनामा केला. पावसाळ्यातील समुद्राचे उधाण, भरती आणि हवामानातील बदलामुळे पक्षी दमल्यामुळे किनाऱ्यावर येऊन बसल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

ब्राऊन बुबी हा सुलिडे कुटुंबातील एक मोठा आणि सामान्य समुद्री पक्षी असून, त्यांची पॅन्ट्रॉपिकल म्हणजेच उष्ण कटिबंधीय भागांमध्ये मोठ्या प्रमाणात उपस्थिती असते. हे पक्षी सहसा किनाऱ्यावरील पाण्यात चारा शोधण्यासाठी कमी उंचीवरून उड्डाण करतात व डुबकी मारून मासे पकडतात. ते जमिनीवरच घरटे बांधतात व पाण्यावरील वस्तूंवर राहत नाहीत.

सदर पक्ष्याची वैद्यकीय तपासणी करून त्याच्या प्रकृतीनुसार पुढील उपाययोजना करण्यात येणार आहेत. ही कारवाई अलिबाग वनपरिक्षेत्र अधिकारी पाटकर व वनपाल संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *