“कोर्लईजवळ आढळलेली बोट पाकिस्तानीच, नौदलाचा खुलासा – कोणताही धोका नाही”

छावा रेवदंडा | ८ जुलै २०२५ (सचिन मयेकर)
समुद्रकिनाऱ्यावर संशयास्पद बोट आढळल्याच्या वृत्ताने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. स्थानिकांनी दिलेल्या माहितीच्या आधारे, नौदलाच्या रडारवर एक बोट आढळून आल्याचे निदर्शनास आले. मात्र प्रत्यक्षात कोणतीही बोट किनाऱ्यावर न सापडल्यामुळे सुरुवातीला संभ्रम निर्माण झाला. तत्काळ सुरक्षेच्या दृष्टीने नौदल, पोलिस आणि अन्य सुरक्षा यंत्रणांनी संयुक्त शोधमोहीम राबवली.
प्राथमिक तपासानुसार, ही बोट खोल समुद्रात असल्याचा अंदाज घेण्यात आला. रायगड पोलीस, नौदल व इतर सुरक्षा यंत्रणांनी तत्काळ प्रतिसाद देत हेलिकॉप्टरच्या सहाय्याने समुद्रात शोध सुरू केला. या तपासादरम्यान, ‘मुकद्दर बोटा ९९’ नावाची एक पाकिस्तानी माशेमारी बोट रडारवर असल्याचे स्पष्ट झाले. हवामानामुळे दिशाभूल होऊन ही बोट भारतीय समुद्रसीमेपर्यंत वाहून आल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
रेवदंडा परिसरात आढळलेली वस्तू ही या बोटीचा एक छोटासा भाग असल्याचे निष्पन्न झाले. संबंधित बोट पाकिस्तानच्या कराचीतून कार्यरत आहे. माशेमारी बोटीवर GPS ट्रॅकर असल्याने नौदलाने त्याच्या मदतीने बोटीची ओळख पटवली. GPS ट्रॅकिंगद्वारे ही बोट पाकिस्तानात असल्याचे निश्चित झाले.
या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ५२ अधिकारी आणि ६०० पोलिसांच्या पथकांनी संपूर्ण जिल्हा पिंजून काढला. चौकशीअंती स्पष्ट करण्यात आले की, बोट भारतात आलेली नसून केवळ काही अवशेष वाहून आले होते. त्यामुळे या प्रकरणात कोणताही सुरक्षेचा धोका नाही. पोलिस व नौदलाने याबाबत खात्रीपूर्वक माहिती दिली असून नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.